चंद्रपूर,
chandrapur-rcert-arwat-surveyसरदार पटेल मेमोरियल सोसायटीद्वारा संचालित येथील राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च ॲण्ड टेक्नॉलॉजी वतीने भारत सरकारच्या ‘उन्नत भारत अभियानांतर्गत’ दत्तक घेतलेल्या आरवट गावात ग्रामस्थांशी संवाद साधून मूलभूत सर्वेक्षण करण्यात आले.
महाविद्यालयाने उन्नत भारत अभियानांतर्गत आरवट, जुनोना, कारवा, मामला आणि वायगाव या पाच गावांना दत्तक घेतले असून, या सर्व गावांमध्ये ग्रामीण विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत अभियांत्रिकी आणि खाण अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी आरवट गावातील सर्वेक्षणात सहभाग घेतला. यावेळी गावातील मूलभूत सुविधा, स्थानिक समस्या, नागरिकांच्या गरजा आणि विकासासंदर्भातील अपेक्षांची माहिती संकलित करण्यात आली. तसेच विविध शासकीय योजनांविषयी ग्रामस्थांना माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमादरम्यान आरवट गावच्या सरपंच सुलभा भोंगारे यांच्याशी चर्चा करून गावाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर विचारविनिमय करण्यात आला. या उपक्रमासाठी प्रा. वझुल खान, डॉ. एम. ए. सय्यद यांनी मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे उन्नत भारत अभियान समन्वयक प्रा. प्रदीप लाड यांनी उपक्रमाच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.