मालेगाव,
navaratri-yatra-festival तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या श्री जगदंबा देवी संस्थान नागरदास येथे शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता यंदा मोठ्या उत्साहात होत आहे. नवरात्र महोत्सवादरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी व सायंकाळी होणार्या महाआरतीला हजारो भाविकांची उपस्थिती लाभत आहे. या महोत्सवाची सांगता १९ ऑक्टोबर २०२६ रोजी होत असून, त्यानिमित्त होम-हवन आणि भव्य महाप्रसाद वाटपाचे आयोजन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री जगदंबा देवी संस्थान नागरदास येथील यात्रा महोत्सवाला ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व आहे. यावर्षीच्या महाप्रसाद कार्यक्रमात परिसरासह विविध जिल्ह्यामधून हजारो भाविक भक्त उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत. भाविकांची विक्रमी गर्दी लक्षात घेऊन संस्थानने जय्यत तयारी केली आहे. १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:०० वाजल्यापासून शिस्तबद्ध पद्धतीने (बारी-बारीने) महाप्रसाद वाटपास प्रारंभ होईल आणि रात्री उशिरापर्यंत हा सोहळा सुरू राहील. या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याला विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. श्री जगदंबा देवी संस्थानच्या वतीने परिसरातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थान विश्वस्त मंडळ च्या वतीने करण्यात आले आहे.
मालेगाव तालुका नव्हे तर जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण असणार्या श्री जगदंबा देवी संस्थान येथे नवरात्र उत्सवानिमित्त नऊ दिवस सातत्याने हजाराच्या संख्येने भाविकांची या ठिकाणी गर्दी असते.नवरात्र निमित्त या ठिकाणी यात्रा महोत्सवाच्या आयोजन केल्या जात असताना विविध साहित्याची खेळण्याची तसेच मनोरंजनाची दुकाने या ठिकाणी थाटल्या जातात तर या ठिकाणी महाप्रसादासाठी मालेगाव ते नागरदास येणार्या भावी भक्तासाठी प्रवाशी वाहनधारकातर्फे मोफत प्रवास व्यवस्था केल्या जाते. पोलिस विभागातर्फे सुद्धा या ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात येतो तर यात्रेकरूंच्या सुविधेसाठी श्री जगदंबा देवी संस्था नागरदास विश्वस्त मंडळी तसेच गावकरी मंडळी व सेवेकरी मंडळी यांच्या वतीने विशेष असे प्रयत्न केले जातात.