नागपूर,
dinanath-school-hockey-team-winsनागपूरच्या धंतोली येथील दीनानाथ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या १७ वर्षांखालील हॉकी संघाने विभागीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावत महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान निश्चित केले. शनिवारी झालेल्या या स्पर्धेत दीनानाथच्या संघाने उपांत्य फेरीत वर्धेचा ४-०, तर अंतिम सामन्यात ब्रह्मपुरीचा ३-० असा पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले.
वर्धेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भावेश पालसकरने दोन फील्ड गोल केले. यश बामनाले आणि प्रथमेश बुराडे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवत संघाच्या विजयात योगदान दिले. अंतिम सामन्यातही भावेशने दोन गोल करत आपली चमक दाखवली, तर यश बामनालेने तिसरा गोल नोंदवून संघाच्या ३-० विजयावर शिक्कामोर्तब केले. प्रशिक्षक डॉ. मंडल यांनी खेळाडूंच्या रणनीतीनुसार केलेल्या खेळाचे कौतुक केले, तर संघ व्यवस्थापक तरुण कुंभारे यांनी या यशाचे श्रेय अनेक महिन्यांच्या कठोर सरावाला दिले.
या यशाबद्दल उपमुख्याध्यापिका रुना घोष, पर्यवेक्षिका वैशाली गुणासेकरन आणि प्रशासक अंजू सेठ यांनी संघाचे अभिनंदन केले. बंगाली एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनानेही खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक चमूचे कौतुक केले. आता दीनानाथचा संघ या महिन्याच्या उत्तरार्धात होणाऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय १७ वर्षांखालील हॉकी स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.