नागपूर/वर्धा
Dr. Gaurav Mishra वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे डॉ. गौरव मिश्रा यांनी इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी या विशेष शाखेत तिसरी पीएच.डी. संपादन केली आहे. १७ व्या दीक्षान्त समारंभात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे, आपल्या मुलाच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्याचा मान त्यांचे वडील डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना मिळाला.वर्धा येथील दत्ता मेघे ऑडिटोरियममध्ये झालेल्या या समारंभाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसुळकर, कार्यकारी संचालक (अकॅडेमिक्स) डॉ. तृप्ती वाघमारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ. गौरव मिश्रा हे जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, सावंगी (मेघे), वर्धा येथील रेडिओडायग्नोसिस विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी २०१८ मध्ये रेडिओडायग्नोसिसमध्ये, तर २०२२ मध्ये हेल्थ प्रोफेशन्स एज्युकेशनमध्ये पीएच.डी. संपादन केली. आता इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमधील तिसऱ्या पीएच.डी.मुळे त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला गेला आहे.एम.डी. (रेडिओडायग्नोसिस) या पदव्युत्तर पदवीनंतरही त्यांनी संशोधन आणि ज्ञानसाधना सुरू ठेवली. हेल्थ प्रोफेशन्स एज्युकेशनमध्ये एम.फिल. करण्यासोबतच अभ्यासक्रम रचना, मूल्यांकन, कार्यक्रम मूल्यमापन आणि जैवनीती या विषयांतील फेलोशिपही त्यांनी मिळवल्या आहेत.
त्यांच्या नावावर पीअर-रिव्ह्यूड आणि इंडेक्स्ड वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये ३५० हून अधिक संशोधन लेख प्रकाशित झाले असून, त्यांनी १४ पुस्तकेही लिहिली आहेत.डॉ. गौरव मिश्रा यांची वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी नियुक्ती झाली होती. त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधनविषयक योगदानाची दखल घेत त्यांना इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्गनायझेशनल सायकोलॉजिकल मेडिसिनची मानद आंतरराष्ट्रीय फेलोशिप (FIIOPM) प्रदान करण्यात आली. नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. अभिजात शेठ यांच्या उपस्थितीत त्यांना हा सन्मान मिळाला.डॉ. गौरव मिश्रा हे कृष्णा विश्व विद्यापीठ, कराडच्या कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा आणि नागपूर येथील लता मंगेशकर विद्यापीठाचे मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांचे सुपुत्र आहेत.
सौजन्य : प्रवीण डबली,संपर्क मित्र