नागपूर,
gururatna-award-2026 शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत राजेंद्र हायस्कूल व जुनियर कॉलेज, नागपूर येथील मुख्याध्यापिका डॉ. स्मिता नाहातकर यांना ‘गुरुरत्न पुरस्कार २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औदुंबर बहुउद्देशीय समाजिक शिक्षण संस्था यांच्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात त्यांना ‘हेड मास्टर श्रेणी’ अंतर्गत गौरविण्यात आले. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाईन्स येथे हा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. नाहातकर यांचा सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे महसूल व वनमंत्री तथा नागपूर व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूरच्या महापौर नीता ठाकरे होत्या. यावेळी पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. ‘गुरुरत्न पुरस्कार २०२६’ हा शिक्षकांच्या समर्पित कार्याचा गौरव करणारा उपक्रम असून, विद्यार्थ्यांचे जीवन घडविणाऱ्या आणि भविष्यातील पिढीला दिशा देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. या सन्मानाबद्दल दि. एम पी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, राजेंद्र हायस्कूल येथील अधिकारी वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.