मुंबई
kapil sharma प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या विनोदी कार्यक्रमांमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र, यावेळी त्याच्या ‘कॅप्स कॅफे’ या व्यवसायाची चर्चा रंगली आहे. कॅनडामध्ये जुलै महिन्यात पहिलं आउटलेट सुरू केल्यानंतर कपिलने आपल्या कॅफेचा विस्तार दुबईपर्यंत केला. ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुबईतील अल किफफ परिसरात त्याने आणखी एक आउटलेट सुरू केलं. नुकतीच कॉमेडियन भारती सिंग हिने या कॅफेला भेट दिली. कॅफेची आकर्षक सजावट आणि आलिशान वातावरण लक्ष वेधून घेत असलं, तरी तिथल्या खाद्यपदार्थांच्या किमतींमुळे सध्या या ठिकाणाची विशेष चर्चा होत आहे.
कॅफेमध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीतील विविध पदार्थांचा समावेश आहे. मात्र, सर्वसामान्यपणे सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांसाठीही ग्राहकांना मोठी रक्कम मोजावी लागत आहे. एका कप मसाला चहाची किंमत ५५० रुपयांच्या आसपास असून, पाणीपुरीच्या एका प्लेटसाठी तब्बल ८०० रुपये आकारले जातात. या मेन्यूमध्ये सर्वाधिक किमतीच्या पदार्थांपैकी चीज पेने पास्ताचा समावेश असून, त्याची किंमत १,६०४ रुपये आहे. विशेष म्हणजे, कॅफेमधील सर्वात स्वस्त पदार्थ असलेल्या एस्प्रेसोसाठीही ४९० रुपये मोजावे लागतात.
डोसा ७७५ रुपये, शेवपुरीची प्लेट ९०५ रुपयांना
कपिल शर्माच्या या कॅफेतील इतर पदार्थांचे दरही लक्षवेधी आहेत. एका डोशासाठी ७७५ रुपये आकारले जातात, तर बॉम्बे सँडविच आणि अॅव्होकॅडो टोस्ट या दोन्ही पदार्थांची किंमत प्रत्येकी १,०३४ रुपये आहे. शेवपुरीच्या एका प्लेटसाठी ९०५ रुपये, तर फ्रेंच टोस्टसाठी १,३०० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे भारतीय खाद्यपदार्थांना या कॅफेमध्ये प्रीमियम स्वरूप देण्यात आल्याचं दिसतं.
मेन्यूमध्ये मेक्सिकन बाउल, बटर चिकन आणि पॅनकेक्स यांसारख्या पदार्थांचाही समावेश आहे. एका आलू पराठ्याची किंमत ७०० रुपये, तर डाळ मखनीसाठी १,०३५ रुपये आकारले जातात. मसाला चहा आणि पाणीपुरीसारख्या नेहमीच्या पदार्थांपासून ते विविध आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांपर्यंत अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत. मात्र, त्यांच्या किमती पाहता या कॅफेमध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी ग्राहकांना चांगलाच खर्च करावा लागणार आहे.
पॅरिसमधील पेस्ट्री शॉप्सपासून सजावटीची प्रेरणा
कॅप्स कॅफेचं वैशिष्ट्य केवळ त्याच्या मेन्यूमध्येच नाही, तर अंतर्गत सजावटीतही आहे. पॅरिसमधील पेस्ट्री शॉप्स अर्थात पॅटिसरीच्या शैलीपासून प्रेरणा घेऊन कॅफेची रचना करण्यात आली आहे. हलका गुलाबी, पांढरा आणि आयव्हरी रंग, पांढऱ्या संगमरवरी पृष्ठभागांचा वापर आणि सोनेरी सजावटीच्या छटा यांमुळे कॅफेला आलिशान स्वरूप प्राप्त झालं आहे. आकर्षक रंगसंगती आणि देखण्या इंटिरिअरमुळे हे ठिकाण खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासोबतच सोशल मीडियावर छायाचित्रे शेअर करण्यासाठीही लोकप्रिय ठरू शकतं.
कॅनडातील कॅफेवर अनेकदा गोळीबार
कपिल शर्माचा ‘कॅप्स कॅफे’ यापूर्वी कॅनडातील गोळीबाराच्या घटनांमुळेही चर्चेत आला होता. कॅफे सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच तेथे गोळीबार झाल्याची घटना घडली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात आणखी एक हल्ला झाला. ऑक्टोबरमध्ये चालत्या वाहनातून करण्यात आलेल्या गोळीबारात कॅफेच्या काचांचं नुकसान झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. काही वृत्तांमध्ये या घटनांचा संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीशी जोडण्यात आला होता; मात्र या दाव्याला स्वतंत्र पुष्टी मिळालेली नसल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. या घटनांमध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याचं वृत्त आहे.
गोळीबाराच्या घटनांवर कपिल शर्माची प्रतिक्रिया
कॅफेवरील हल्ल्यांबाबत कपिल शर्मानेही प्रतिक्रिया दिली होती. नोव्हेंबरमध्ये ‘किस किसको प्यार करूं २’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याला या घटनांविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी कपिलने सांगितलं की, गोळीबाराच्या प्रत्येक घटनेनंतर कॅफेला आधीपेक्षा चांगली ओपनिंग मिळाली. “देव माझ्या पाठीशी असेल, तर सर्व काही ठीक होईल,” अशा शब्दांत त्याने आपली भूमिका मांडली होती.
दरम्यान, कपिल शर्मा सध्या नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. एका बाजूला त्याच्या कॅफेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार होत असताना, दुसरीकडे दुबईतील आउटलेटमधील खाद्यपदार्थांच्या अव्वाच्या सव्वा किमती आणि कॅनडातील कॅफेवरील हल्ल्यांच्या घटनांमुळे त्याचा हा व्यवसाय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.