krutis-navratri-special-look अभिनेत्री कृती सॅनॉन आपल्या अभिनयासोबतच फॅशन सेन्समुळेही चाहत्यांमध्ये चर्चेत असते. यावेळी तिच्या पारंपरिक वेशभूषेने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे. नवरात्रीच्या उत्सवी वातावरणाला साजेसा तिचा शाही लूक दांडिया नाईटसाठी खास फॅशन प्रेरणा ठरत आहे. कृतीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती जांभळ्या रंगाच्या पँटसोबत सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केलेली दिसते. या पोशाखाला तिने आकर्षक दुपट्ट्याची जोड दिली आहे. दुपट्ट्याच्या काठावर सजवलेल्या कवड्या आणि मोत्यांमुळे तिच्या संपूर्ण वेशभूषेला पारंपरिक आणि राजेशाही स्पर्श मिळाला आहे.

अभिनेत्रीने या पोशाखासोबत गळ्यात चोकर नेकलेस आणि कानात त्याला साजेसे दागिने घातले आहेत. हातातील बांगड्या आणि अंगठीमुळे तिच्या लूकमध्ये आणखी भर पडली आहे. पारंपरिक दागिने आणि रंगांची सुरेख सांगड घालत तिने साधेपणासोबतच आकर्षक स्टाइलही जपली आहे. कृतीच्या मेकअप आणि हेअरस्टाइलनेही चाहत्यांचे लक्ष वेधले. तिने चेहऱ्यासाठी नैसर्गिक दिसणारा न्यूड मेकअप निवडला असून, कपाळावरील छोटीशी टिकली तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. मोकळ्या केसांमुळे तिचा पारंपरिक पोशाख अधिक खुलून दिसत आहे.
या फोटोंच्या पार्श्वभूमीवर गुलाबी बोगनव्हिलियाची फुले दिसत असून, त्यामुळे छायाचित्रांना प्रसन्न आणि नैसर्गिक वातावरणाची जोड मिळाली आहे. हे फोटो शेअर करताना कृतीने ‘नेहमी टिकली लावणारी मुलगी’ असा आशय असलेले कॅप्शन दिले आहे. नवरात्रीत दांडिया किंवा गरबा खेळण्यासाठी पारंपरिक पोशाख निवडताना कृतीचा हा लूक एक पर्याय ठरू शकतो. जांभळा आणि सोनेरी रंग, मोत्यांनी सजवलेला दुपट्टा, पारंपरिक दागिने आणि छोटी टिकली यांचा मेळ साधून उत्सवी लूक अधिक आकर्षक करता येऊ शकतो. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या कृतीने यापूर्वीही पारंपरिक वेशभूषेतील अनेक छायाचित्रे चाहत्यांसोबत शेअर केली आहेत.