प्रेरणा एक्स्प्रेसमधून उतरताना तोल गेला

आरपीएफ महिला अधिकाऱ्याने वाचवला वृद्धेचा जीव!

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
'ऑपरेशन जीवन रक्षा': अकोला स्थानकावर पुन्हा एकदा देवदूत ठरल्या सोनल इंगळे
अकोला,
prerana-express धावत्या ट्रेनमधून उतरताना तोल जाऊन रेल्वे रुळावर पडणाऱ्या एका ५५ वर्षीय वृद्ध महिलेला रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) महिला अधिकाऱ्याने स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता सुरक्षित बाहेर काढले. ही थरारक घटना शनिवारी १७ ऑक्टोबर अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ०१ वर घडली. महिला सहायक पोलीस निरीक्षक (ASI) सोनल इंगळे यांच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला असून, गेल्या अवघ्या सात दिवसांत त्यांनी दुसऱ्यांदा प्रवाशाचा जीव वाचवून 'ऑपरेशन जीवन रक्षा' यशस्वी करून दाखवले आहे.
 
prerana-express
 
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळांतर्गत येणाऱ्या अकोला रेल्वे स्थानकावरून गाडी क्रमांक २२१३८ नागपूर - अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस सुटत असताना, संगीता भरत खत्री वय ५५ वर्ष, रा. अकोला या धावत्या ट्रेनमधून उलट्या दिशेने खाली उतरण्याचा प्रयत्न करत होत्या. या दरम्यान त्यांचा तोल गेला आणि त्या प्लॅटफॉर्म व धावत्या ट्रेनमधील मोकळ्या जागेत घसरून पडू लागल्या. कर्तव्यावर असलेल्या आरपीएफच्या महिला सहायक उपनिरीक्षक सोनल इंगळे यांच्या हे तात्काळ लक्षात आले. क्षणाचाही विलंब न लावता सोनल इंगळे यांनी तत्परतेने पुढे धाव घेत वृद्ध महिलेला घट्ट पकडून सुरक्षितपणे प्लॅटफॉर्मच्या बाजूला खेचले. या घटनेत महिलेला किरकोळ खरचटले असून एक मोठा अनर्थ टळला.
 
संगीता खत्री यांच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट होते. त्या आपल्या वृद्ध नातेवाइकांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर आल्या होत्या. गाडीमध्ये जैन मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असल्याने, त्या धावत्या गाडीतून उतरताना तोल जाऊन पडल्या. ऐनवेळी मिळालेल्या मदतीबद्दल त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी सोनल इंगळे तसेच रेल्वे प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.
 
सात दिवसांत दोन जणांना जीवनदान
विशेष म्हणजे अवघ्या सात दिवसांपूर्वी, म्हणजेच १० ऑक्टोबर २०२६ रोजी प्लॅटफॉर्म क्रमांक ०२ वर गाडी क्रमांक १२६५५ अहमदाबाद - चेन्नई नवजीवन एक्सप्रेसमध्ये चढताना तोल जाऊन पडणाऱ्या एका दिव्यांग वृद्ध प्रवाशाचा जीवही सोनल इंगळे यांनी अशाच प्रकारे वाचवला होता. एकाच आठवड्यात दोन प्रवाशांचे प्राण वाचवून त्यांनी आरपीएफच्या 'ऑपरेशन जीवन रक्षा' अभियानांतर्गत अदम्य साहस आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श निर्माण केला आहे.