राज्यातील ४८९ वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदोन्नतीच्या कक्षेत!

सहायक पोलिस आयुक्त पदावर मिळणार बढती

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर,
maharashtra-police-promotion-listगेल्या अनेक दिवसांपासून पोलिस दलातील पदोन्नतीला ‘ब्रेक’ लागला असून दसरा-दिवाळी सणादरम्यान पदोन्नतीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सहायक पोलिस आयुक्त, पोलिस उपाधीक्षक पदावर पदोन्नतीच्या कक्षेत असलेल्या राज्यातील ४८९ पोलिस निरीक्षकांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे येत्या वर्षाखेरीस राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांना ‘गुड न्यूज’ मिळण्याचे संकेत आहेत.
 
 
varishth
राज्य पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असतानाच गृहमंत्रालयाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला. बुधवारी रात्री राज्यातील ४८९ पोलिस निरीक्षकांच्या नावांचा समावेश असलेली यादी जाहीर करण्यात आली. यामधील सर्वच पोलिस निरीक्षक सेवाज्येष्ठता यादीनुसार सहायक पोलिस आयुक्त, पोलिस उपाधीक्षक पदावर पदोन्नतीच्या कक्षेत आहेत. राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या होत्या. पोलिस महासंचालक कार्यालय आणि आस्थापना विभागात ताळमेळ नसल्यामुळे पदोन्नत्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पदोन्नतीस पात्र ठरल्यानंतरही पदोन्नती मिळत नसल्याने पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खदखद होती. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात एसीपी आणि उपाधीक्षक पदे रिक्त असून फक्त लालफितशाहीमुळे पदोन्नती रखडली आहे. बुधवारी सेवाज्येष्ठता यादीसह पदोन्नतीच्या कक्षेत असलेल्या पोलिस निरीक्षकांची यादी जाहीर झाल्यामुळे अधिकारी वर्गांत आनंद झाला आहे.
........
वर्षाअखेरीस पदोन्नती मिळणार !
पदोन्नती देण्यासाठी येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस निरीक्षक अधिकाऱ्यांना माहिती मागविण्यात आली आहे. ती माहिती पाठविल्यानंतर जवळपास डिसेंबरच्या अखेरीस पदोन्नतीचा यादी जाहीर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एसीपी पदावर बढती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, यापूर्वी एसीपी पदोन्नतीसाठी पाच महिन्यांचा कालावधी लागला होता, त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये धाकधूक आहे.
.........
कनिष्ठांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा
सध्या पोलिस उपनिरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षक पदोन्नतीच्या कक्षेत आहेत. तुकडी क्रमांक १०७ पासून पदोन्नत्या थांबल्या आहेत. जर एसीपी पदावर पदोन्नतीची यादी डिसेंबरमध्ये जाहीर झाल्यास नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची यादी निघेल. त्यामुळे वरिष्ठांच्या पदोन्नतीला उशिर झाल्यास कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.