पुन्हा पावसाची हजेरी! कोल्हापूर ते नाशिकपर्यंत सरी

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांची चिंता वाढली

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
मुंबई
maharashtra rain alert महाराष्ट्रात यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. परतीच्या पावसानेही अपेक्षित साथ न दिल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. अशातच राज्यातील हवामानात पुन्हा बदल झाला असून, अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, चिपळूण, धुळे, मालेगाव आणि सांगलीसह विविध ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता कायम आहे.
 

maharashtra rain alert  
गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या दक्षिण महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांत पुन्हा तुरळक स्वरूपाचा, तर काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि मालेगाव परिसरातही पावसाने हजेरी लावली. बंगालच्या उपसागरातून येणारे वारे आणि हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही भागांत वातावरण बदलले असून, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २२ ते २९ ऑक्टोबरदरम्यान मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मुंबई आणि परिसरातही ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
 
 
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि बागलाण तालुक्यातील मुल्हेर परिसरात दुष्काळी परिस्थिती असतानाच वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दुपारनंतर अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आणि वादळी वारे अनुभवायला मिळाले. या पावसामुळे काढणीसाठी तयार असलेल्या काही पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच कांद्याच्या रोपांनाही फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
पावसाच्या या अनपेक्षित maharashtra rain alert  आगमनामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतीच्या दृष्टीने त्याचे फायदे मर्यादित ठरण्याची शक्यता आहे. पावसाळ्याचा महत्त्वाचा कालावधी उलटून गेल्यानंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. पिकांना ज्या वेळी पावसाची सर्वाधिक गरज होती, त्या वेळी पाऊस न झाल्याने नुकसान झाले. आता उशिरा होणाऱ्या पावसामुळे तयार पिकांना आणि कांद्याच्या रोपांना धोका निर्माण होऊ शकतो.
दुसरीकडे, राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. उपलब्ध जलसाठा जपून वापरण्याला प्राधान्य दिले जात असून, धरणांमधील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्णय घेतले जात आहेत. याचा परिणाम शेतीच्या सिंचनावर होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यासह पाच तालुक्यांतील सिंचन व्यवस्थेवर यंदा परिणाम होऊ शकतो.
 
 
खडकवासला धरण प्रकल्पातील उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याने यंदा कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार नसल्याचे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
 
एकीकडे राज्यातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळत असल्या, तरी दुसरीकडे पाणीटंचाई आणि शेतीच्या नुकसानीचे संकट कायम आहे. उशिरा झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी त्याचा शेती आणि जलसाठ्यांवर कितपत सकारात्मक परिणाम होतो, हे आगामी काळात स्पष्ट होईल. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे लागले आहे.