अनिल कांबळे
नागपूर
nagpur police security येत्या मंगळवारी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी शहरात धम्मचक्रप्रवर्तन दिन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी दिवस, पथसंचलन आणि रावणदहन यासह मिरवणुका नियोजित आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तब्बल पाच हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. पहिल्यांदाच बंदोबस्त, मिरवणुका आणि अन्य कार्यक्रमासाठी एआय तंत्राचा वापर पोलिस करीत आहेत.
दीक्षाभूमीवरील बंदोबस्तासाठी २ पोलिस उपायुक्त, १ सहाय्यक पोलिस आयुक्त, २० पोलिस निरीक्षक, आणि ४० पोलिस उपनिरीक्षक असे एकूण ७१ अधिकारी व ६०० पोलिस आणि एक राज्य राखीव दलाची तुकडी तैनात असेल. याशिवाय शहरात १००० होमगार्ड, १० पोलिस उपायुक्तांसह १२ सहायक पोलिस आयुक्त, ७० पोलिस निरीक्षक, ४० साहाय्यक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांसह हवालदार आणि अंमलदारांसह तीन राज्य राखीव दलाचा कंपन्यांचा समावेश आहे. याखेरीज शीघ्र कृती दल (क्युआरटी) व दंगल नियंत्रण पोलिस पथक (आरसीपी)सुद्धा या परिसरात तैनात राहणार आहे.
दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या मुख्य सोहळण्यात मोठी गर्दी होते. या गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांनी कडेकोट नियोजन केले आहे. दीक्षाभूमीकडे येणाऱ्या चारही कोपऱ्यावर थांबे देण्यात आले आहेत. आतील गर्दी कमी होईपर्यंत बाहेरील गर्दीला रोखून ठेवले जाईल. याशिवाय कामठीतील ड्रॅगन पॅलेसमध्येही जवळपास साडेचारशे पोलिस अधिकारी कर्मचारी तैनात असतील. संविधान चौक, नागलोक येथे शंभर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तात समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आणि पथसंचलन होणार आहे. शिस्तबद्ध असलेल्या या कार्यक्रमासाठी वाहतूक पोलिसांसह सुरक्षा व्यवस्था सज्ज आहे.
दीक्षाभूमीला छावणीचे स्वरुप
दीक्षाभूमीवर अलोट गर्दी असते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच सीसीटीव्हीमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानाचा समावेश असून त्यातून गर्दीत फिरणारे चोर, लुटारूंची ओळख पटवता येणे सोपे होणार आहे. दीक्षाभूमीवर मंगळवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार आहे. पोलिसांनी दिक्षाभूमीकडे जाणारा लक्ष्मीनगर चौक, बजाजनगर चौक, काचीपुरा, माताकचेरी चौकाजवळचे रस्ते सीसीटीव्हींनी सज्ज ठेवले आहेत. तसेच साध्या वेशातील पोलिससुद्धा गर्दीत ठेवण्यात आले आहेत.
शहरात ६४ ठिकाणी रावणदहन
शहरातील मुख्य आकर्षण असलेल्या रावण दहनासाठी मोठी गर्दी होत असते. दसऱ्यानंतर विजयादशमीच्या पर्वावर शहरात ६४ ठिकाणी रावण दहन होणार असून, वाडी व पारडीत सर्वाधिक प्रत्येकी चार ठिकाणी रावण होईल. यामध्ये प्रामुख्याने कस्तुरचंद पार्क, तिरंगा चौक, नंदनवन, दर्शन कॉलनी, राजाबक्षा, चोपडे लॉन, मनिषनगर, मानेवाडा, रेशीमबाग आणि इतर ठिकाणी रावणदहनाचे कार्यक्रम होतील. या खेरीज शहरातील ८३५ सार्वजनिक दुर्गा मूर्ती विसर्जन, ९० ठिकाणी घट विसर्जनानिमित्तही बंदोबस्त लावण्यात आला आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस सज्ज आहेत. शहरात ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आला आहे. काही पोलिस कर्मचारी साध्या वेशात तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांना कळवावे.
- नवीनचंद्र रेड्डी (पोलिस सहआयुक्त)