मृत्यूनंतरही नेत्रांतून जिवंत राहणार पंढरी मांदळकर यांची माणुसकी!

मरणोत्तर नेत्रदानातून मांदळकर कुटुंबीयांचा मानवतेचा आदर्श

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
वाशीम,
mandalkar-family मृत्यूनंतरही दुसर्‍यांच्या आयुष्यात प्रकाश फुलविण्याची प्रेरणा रिसोड तालुक्यातील केशवनगर येथील पंढरी वसंता मांदळकर (वय ३१) यांच्या मरणोत्तर नेत्रदानातून मिळाली आहे. त्यांच्या निधनानंतर दुःखाच्या प्रसंगातही कुटुंबीयांनी नेत्रदानाचा निर्णय घेत सामाजिक बांधिलकी जपली.
 
 
mandalkar-family
 
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश पुरी, नेत्रशल्यचिकित्सक डॉ. आशिष बेदरकर आणि डॉ. डाखोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे, नेत्रचिकित्सा अधिकारी सुधीर साळवे आणि ओम राऊत यांनी नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. संकलित नेत्रगोलके शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे पाठविण्यात आली. या कार्यासाठी विजय जाधव, गौरीशंकर तेलंगे, विठ्ठल मांदळकर, ऋषिकेश मांदळकर, संतोष मांदळकर, प्रवीण ढोके, रवी कांबळे आणि उकंडी यांनी विशेष प्रयत्न केले.
 
 
मरणोत्तर नेत्रदानामुळे कॉर्नियाशी संबंधित अंधत्व असलेल्या रुग्णांना दृष्टी मिळण्याची आशा निर्माण होते. त्यामुळे नागरिकांनी नेत्रदान चळवळीत सहभागी व्हावे आणि मृत्यूनंतर नेत्रदानासाठी तातडीने वैद्यकीय पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले. त्यांनी मांदळकर कुटुंबीयांचे आभारही मानले.