मुंबई
rakhi sawant बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतच्या अडचणी वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशातील झाशी येथील जिल्हा न्यायालयाने राखी सावंतविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. तब्बल १६ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणाशी हा खटला संबंधित असून, राखी सावंतच्या ‘राखी का इंसाफ’ या टीव्ही शोमध्ये सहभागी झालेल्या एका व्यक्तीच्या आत्महत्येप्रकरणी हे प्रकरण चर्चेत आले आहे.
नोव्हेंबर २०१० मध्ये झाशीतील प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा एक व्यक्ती आपल्या पत्नीशी असलेला वैवाहिक वाद सोडवण्यासाठी राखी सावंतच्या ‘राखी का इंसाफ’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात राखी सावंत या जोडप्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यावेळी त्यांनी संबंधित व्यक्तीला ‘नामर्द’ असे संबोधल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर काही काळातच त्या व्यक्तीने आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणाने कायदेशीर वळण घेतले.
पीटीआयच्या वृत्तानुसार, जिल्हा सरकारी वकील (फौजदारी) मृदुल कांत श्रीवास्तव यांनी या प्रकरणाची माहिती दिली. फास्ट ट्रॅक न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी शुक्रवारी राखी सावंतविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. न्यायालयाकडून वारंवार समन्स बजावण्यात आल्यानंतरही राखी सावंत सुनावणीसाठी हजर राहिली नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ डिसेंबर रोजी होणार आहे.
दरम्यान, अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर राखी सावंतने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली. या प्रकरणामागे कोण आहे, हे सर्वांना माहीत असल्याचे सांगत देशासाठी तुरुंगात जावे लागले तरी आपण तयार असल्याचे तिने म्हटले. यावेळी तिने ‘भारत माता की जय’, ‘जय भीम’, ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा दिल्या.
आपल्यावर दाखल rakhi sawant असलेल्या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावाही राखी सावंतने केला. २०१० मध्ये ‘राखी का इंसाफ’ हा कार्यक्रम सुरू होता आणि त्या कार्यक्रमासाठी इतरांप्रमाणेच आपलाही चॅनेलसोबत करार झाला होता, असे तिने सांगितले. आपण केवळ सूत्रसंचालक म्हणून काम करत होतो आणि चॅनेलकडून सांगण्यात येणाऱ्या गोष्टी कार्यक्रमात बोलत होतो, असेही तिने स्पष्ट केले.
संबंधित व्यक्तीला आपण वैयक्तिकरीत्या ओळखत नसल्याचे आणि इतक्या वर्षांपूर्वीच्या घटनेची आपल्याला नीट आठवण नसल्याचे राखी सावंतने व्हिडिओमध्ये म्हटले. कार्यक्रम संपल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्यासाठी चॅनेल तसेच आपल्याला जबाबदार धरणे योग्य नसल्याचा दावा तिने केला. मात्र, या प्रकरणात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले असून, आता १ डिसेंबरच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.