रत्नागिरी
ratnagiri news रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (MES) आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीचा तिच्या राहत्या खोलीत मृत्यू झाला आहे. दिव्या काळे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, या घटनेमुळे शैक्षणिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या काळे ही मूळची छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी होती. ती लोटे येथील एमईएस आयुर्वेदिक महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. शिक्षणासाठी ती परिसरातील एका खासगी खोलीत भाड्याने राहत होती. याच खोलीत ती मृतावस्थेत आढळून आली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ratnagiri news पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह तिच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आला.दरम्यान, दिव्या काळे हिच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत. या तपासाचा भाग म्हणून तिच्यासोबत राहणाऱ्या मैत्रिणींचीही चौकशी करण्यात येत आहे. दिव्या कोणत्या कारणामुळे तणावात होती का, तसेच या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, याची पडताळणी पोलीस करत आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तपासातूनच घटनेमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. एका विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, लोटे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.