कोलकाता दुर्घटनेतील जखमींची शहांकडून पाहणी!

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
चोरबागान,
Shah inspects those injured in Kolkata tragedy कोलकात्यातील चोरबागान दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. या घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी कालीघाट येथील दुर्गा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अपोलो रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारीही उपस्थित होते. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी पूजा समितीचे सचिव आणि उपाध्यक्ष यांच्यासह सात जणांना अटक केली आहे.
 
 
kolka
 
पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे राज कुमार सेवदा उर्फ राजा (४८), शंतनू दुबे (५५), बिप्लब मुखर्जी उर्फ जॉय (४८), कौशिक साहा (५३), पिंटू डे (५१), सुमन चक्रवर्ती (३०) आणि राजेश पाल (२९) अशी आहेत. राज कुमार सेवदा हे चोरबागान पूजा समितीचे सचिव, तर शंतनू दुबे हे उपाध्यक्ष आहेत. बिप्लब मुखर्जी मंडपाची बांबूची रचना उभारण्याच्या कामात सहभागी होते. कौशिक साहा यांच्याकडे गर्दी नियंत्रण आणि व्हीआयपी पास तपासणीची जबाबदारी होती, तर पिंटू डे गर्दी व्यवस्थापनाशी संबंधित होते. सुमन चक्रवर्ती आणि राजेश पाल हे खासगी सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत होते. मंडपाची उभारणी, गर्दीचे नियोजन, प्रवेश-निर्गमन मार्ग आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींच्या अनुषंगाने तपास सुरू आहे.
 
 
प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी अचानक पाऊस सुरू झाल्यानंतर अनेकांनी मंडपात आश्रय घेण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे बाहेर पडण्याच्या दरवाजाजवळ गर्दीचा दबाव वाढला आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी खासगी सुरक्षा यंत्रणेकडून शिट्ट्या वाजवून तसेच ध्वनिक्षेपकावरून व्हीआयपी पासबाबत घोषणा केल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रणाची पद्धत आणि मंडपातील सुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली जात आहे. पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या अमित शाह यांनी दुर्घटनेनंतर दुर्गापूजा मंडपाला भेट देण्याचे नियोजित कार्यक्रम रद्द केले होते.