एकतर्फी प्रेमातून तरुणाने कॉलेजच्या तरुणीला संपवलं!

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
मुंबई,
sindhudurg-crime-murderएकतर्फी प्रेमातून अनेकदा गंभीर गुन्ह्याच्या घटना घडल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामध्ये, मुलींवर अन्याय, अत्याचार तर कधी त्यांना जीव देखील गमवावा लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. आता, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील वर्दे कडावल गावातही असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवती दामिनी पालव हिची निर्घृण हत्या करुन फरार झालेल्या आरोपीला सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली.
 
sindh
 
साहिल धुरी या आरोपीला पोलिसांनी रात्री त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यावेळी, आरोपीचे रक्ताने माखलेले कपडे पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, महाविद्यालयीन तरुणीच्या हत्येमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावरुन ओळख निर्माण झाल्यानंतर आरोपी साहिल धुरी याचे दामिनी पालव हिच्याबाबत एकतर्फी प्रेम निर्माण झाले होते. दामिनीने त्याच्या प्रेमाला प्रतिसाद दिला नाही, दरम्यानच्या काळात तिचे लग्न ठरल्याच्या रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
 
आरोपी साहिल हा दामिनीची वाट पाहत घटनास्थळी थांबला होता. महाविद्यालयातून एसटीने प्रवास करून दामिनी आपल्या गावात उतरुन घरी जात असताना आरोपीने तिची वाट अडवली. त्याने तिच्याकडे प्रेम स्वीकारण्याचा आग्रह धरला. मात्र, दामिनीने नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात दामिनीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून पुरावे गोळा करत आहेत. दरम्यान, आरोपीला आज न्यायालयात हजर केले जात आहे. मात्र, या घटनेनं कॉलेजमधील तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. दरम्यान, सोशल मीडियाचा वापर करताना आपण कोणाला मित्र यादीत जोडतो आणि कोणासोबत संवाद साधतो हेही पडताळणे गरजेचं असल्याचं दिसून येतं.