कारंजा (घा.)
teacher suspended शाळेत मद्यधुंद अवस्थेत येऊन भर वर्गासमोर लघुशंका करणार्या शिक्षकाला अखेर निलंबित करण्यात आले आहे. जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी नुकताच हा आदेश काढला असून, त्यामुळे कारंजा तालुयात एकच खळबळ उडाली आहे.
सारवाडी केंद्राअंतर्गत येणार्या किन्हाळा जि. प. प्राथमिक शाळेत कैलास गवळी हे विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १२ रोजी ते दारू पिऊन शाळेत हजर झाले आणि त्यांनी थेट वर्गासमोरच लघुशंका केली. हा प्रकार पाहून विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. तक्रारीवरून शिक्षकावर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून वैद्यकीय तपासणीही करण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पालक आणि मुख्याध्यापकांनी एकत्र येत गटशिक्षणाधिकार्यांकडे याबाबतची लेखी तक्रार केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गटशिक्षणाधिकारी पंकजा तायडे यांनी स्वतः शाळेला भेट देऊन चौकशी केली आणि आपला सविस्तर अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला. अहवालात गवळी यांचे कृत्य हे शिक्षकी पेशाला न शोभणारे, अत्यंत गंभीर आणि प्रशासनाची बदनामी करणारे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ च्या नियम ३ चा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, ही कारवाई मागे घेण्यासाठी कोणत्याही राजकीय नेत्याचा किंवा वरिष्ठ अधिकार्याचा दबाव आणल्यास अधिक कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही या आदेशात देण्यात आला आहे.
निलंबन काळात आर्वी हेच मुख्यालय
निलंबन काळात कैलास गवळी यांचे मुख्यालय पंचायत समिती, आर्वी येथे निश्चित करण्यात आले असून, गटशिक्षणाधिकार्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच या काळात कोणताही खाजगी व्यवसाय, धंदा किंवा नोकरी करता येणार नाही, असे आदेशात नमूद आहे. दरमहा खाजगी व्यवसाय करीत नसल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांना निलंबन भत्ता मिळेल.
शिक्षकांचे गैरवर्तन खपवून घेणार नाही
या शिक्षकाच्या बाबतीत यापूर्वीच्या काही तक्रारी होत्या. त्यामुळे घडलेला प्रकार गंभीर असल्याने तसा अहवाल सादर करण्यात आला. यापुढेही तालुयातील कुठल्याही शिक्षकांने कार्यालयीन वेळेत गैरवर्तन केल्यास खपवून घेतल्या जाणार नाही, अशी प्रतिक्रीया पं.स. गटशिक्षणाधिकारी पंकजा तायडे यांनी दिली.