छत्रपती संभाजीनगर
the maple lawn छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध द मेपल लॉन अँड रेस्टॉरंटवर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) कठोर कारवाई केली आहे. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने प्रशासनाने या रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित केला आहे. अचानक करण्यात आलेल्या तपासणीत रेस्टॉरंटला ९६ पैकी अवघे १७ गुण मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने द मेपल लॉन अँड रेस्टॉरंटची अचानक तपासणी केली. या वेळी अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छतेशी संबंधित नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान रेस्टॉरंटची कामगिरी अत्यंत असमाधानकारक आढळली. एकूण ९६ गुणांच्या मूल्यांकनात केवळ १७ गुण मिळाल्याने अन्नसुरक्षेच्या नियमांच्या पालनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले.
या प्रकाराची दखल घेत ग्राहकांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होऊ नये, या उद्देशाने प्रशासनाने रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईमुळे शहरातील अन्य हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सनाही अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचा स्पष्ट संदेश मिळाला आहे.नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधून अन्नपदार्थ घेताना नागरिकांनीही स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.