देवी दर्शनावरून येताना भीषण अपघात; तीन तरुण ठार

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
कारंजा
accident नवरात्रोत्सवानिमित्त काटोल जि. नागपूर येथे देवी दर्शन करून दुचाकीने परत येत असताना क्रुझरच्या धडकेत तीन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यातील दोन तरुण कारंजा येथील तर एक जण कोंढाळी येथील आहे. यातील दोन तरुण सख्खे चुलतभाऊ असल्याने एकाच परिवारावर ऐन दसर्‍यापुढे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना १७ रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास कोंढाळी-काटोल मार्गावरील चक्रीघाट पंचधारा परिसरात घडली.
 

three youths killed in tragic accident on katol-kondhali road after devi darshan 
मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा तालुयातील दोन आणि कोंढाळी येथील एक तरुण नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील दुर्गोत्सव बघण्याकरिता दुचाकीने जात होते. दरम्यान, चक्रीघाट येथे त्यांच्या दुचाकीला क्रुझर वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. यात कारंजा येथील दीपांशु दामोदर चाफले (२४) आणि रोशन मारुती चाफले रा. कोंढाळी आणि लोकेश जगदीश बारंगे रा. माणिकवाडा कारंजा यांचा समावेश आहे. यापैकी दीपांशू आणि रोशन हे सख्खे चुलत भाऊ होते. तिघेही तरुण काटोल येथून देवीचे दर्शन घेऊन कोंढाळीकडे येत असल्याचे सांगण्यात येते.
अपघाताची माहिती मिळताच कोंढाळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुमित परतेकी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी काटोल ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघाताची कोंढाळी पोलिसांनी नोंद घेतली आहे.