नाशिक
UPSC नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल सोमासे असे मृत तरुणाचे नाव असून, तो दिल्लीत राहून यूपीएससी परीक्षेची तयारी करत होता. दसरा सण साजरा करण्यासाठी तो नुकताच आपल्या गावी आला होता. मात्र, ही सुट्टी त्याच्या आयुष्यातील शेवटची ठरली. या घटनेमुळे चांदवड तालुक्यासह त्याच्या मूळ गावात शोककळा पसरली आहे.
राहुल हा गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थी होता. शासकीय अधिकारी होऊन कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने तो दिल्लीत राहून यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करत होता. कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर भविष्यात मोठे यश मिळवण्याची त्याची इच्छा होती. मात्र, काळाने घातलेल्या घावामुळे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
मिळालेल्या माहितीनुसार, दसऱ्याच्या सुट्टीसाठी राहुल आपल्या घरी आला होता. त्याच्या चुलत्याने घरातील आजारी बैलाला पाण्यात पोहण्यासाठी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार राहुल आपल्या चुलत भावासोबत बैलाला घेऊन मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणावर गेला होता.
बैलाला पाण्यात नेत असताना UPSC राहुलला धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. तो खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. अधिकारी होण्यासाठी दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या तरुणाचा अशा प्रकारे अंत झाल्याने नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.राहुलच्या मृत्यूमुळे सोमासे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाच्या आशा आणि स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी मेहनत करणाऱ्या राहुलचा प्रवास अचानक संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.