धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा प्राचीन वारसा जपणारी मरीमाता

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
सुधाकर क्षीरसागर
 
 
मंगरुळनाथ,
washim-news मरी माता मंदिर हे शहरातील सर्वांत जुन्या मंदिरापैकी एक असल्याचे सांगितले जाते. या मंदिराला धार्मिक श्रद्धेसोबतच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वही लाभले आहे. अनेक वर्षांपासून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनलेले हे मंदिर शहराच्या परंपरेची व लोकजीवनातील भक्ती भावाची साक्ष देत आहे. मरी मातेच्या या मंदिरात बाराही महिने भाविक भक्तांची सारखी गर्दी असते. नवरात्र उत्सवात या मंदिरावर विशेष सजावट केली जाते.
 
 
washim-news
 
मरी माता देवीप्रती भाविकांच्या मनात विशेष श्रद्धा असून, देवीचे दर्शन घेण्यासाठी वर्षभर भक्त मंदिरात येतात. विविध धार्मिक प्रसंगांमध्ये मंदिरात पूजा-अर्चा, आरती आणि धार्मिक विधी केले जातात. विशेषतः सण-उत्सवांच्या काळात मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. देवीच्या चरणी नतमस्तक होऊन अनेक भाविक सुख, शांती, समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. नवरात्र काळात मरी माता मंदिरात भावी भक्तांची विशेष गर्दी असते नऊ दिवस भावीक भक्त उपवास करून मातेची भक्ती करतात मंगरूळनाथ शहरातील हे सर्वात जागृत स्थान असल्याचे जुने जाणकार सांगतात. शहरातील जुन्या धार्मिक स्थळांमध्ये मंदिराचे स्थान केवळ पूजास्थानापुरते मर्यादित नसते, तर ती स्थळे स्थानिक समाजाच्या परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक ठरतात. मरी माता मंदिरालाही अशाच श्रद्धा परंपरेचा वारसा लाभला आहे.
 
 
विशेषतः १९७२ च्या भीषण दुष्काळात संपूर्ण मंगरूळनाथ शहराला पाणीपुरवठा करणारी मरी मातेच्या मंदिरातील विहीर आजही शहराच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आठवण म्हणून सांगितली जाते. त्या काळात अन्नासाठी संघर्ष सुरू असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. अशा वेळी मरी मातेच्या शेजारील विहिरीने मात्र कधीही साथ सोडली नाही,अशी आठवण अनूभवी नागरिक सांगतात.
 
 
मरी माता मंदिर हे मंगरूळनाथ शहरातील श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. मरी माता जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा होती. मंदिर आणि त्याच्या शेजारील विहीर यांच्याशी नागरिकांच्या भावनिक आठवणी जोडलेल्या होत्या. १९७२ च्या दुष्काळात संपूर्ण मंगरूळनाथची तहान भागविणारी मरी मातेची विहीर आज काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी शहराच्या सामूहिक स्मृतीत तिचे स्थान आजही अढळ आहे.
 
 
१९७२ चा हा पाण्याचा महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत कठीण काळ म्हणून ओळखला जातो. ज्या ज्या वर्षी दुष्काळ पडला त्या त्या वर्षी मरी मातेच्या या गोड्या पाण्याच्या विहिरीने सर्व गावाला पाणी पुरविले असल्याची साक्ष आजही प्रत्यक्षदर्शी देतात. जुन्या जमान्यात विहिरींना खूप महत्त्व दिले जात होते. दुष्काळ परिस्थितीत ग्रामीण भागासह शहरांनाही पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता.अशा कठीण परिस्थितीत मंगरूळनाथ शहरातील नागरिकांसाठी मरी मातेची मंदिर विहीर पाण्याचा महत्त्वाचा आधार ठरली होती.