बंधारा चार वर्षात फुटलाच कसा? यशोदा नदी कोरडी!

शहरावर पाणीटंचाईचे सावट

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
देवळी,
yeshoda river यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना येथील यशोदा नदीवर मोक्षधामलगत पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेला बंधारा संबंधित विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पुराच्या पाण्याने दुसरीकडून मार्ग केल्याने फुटला आहे. त्यामुळे दीड किलोमीटरपर्यंत साठून राहणारे पाणी पूर्ण वाहून गेल्याने यशोदा नदी कोरडी पडली आहे. तो बंधारा फुटलाच कसा असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
 

yeshoda river  
 
 
हा बंधारा कोरडा झाल्याने परिसरातील शेतकर्‍यांच्या विहिरींची पाणी पातळी खोल गेली आहे तर देवळी शहराला नगरपालिकेद्वारे पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींची पाणी पातळी सुद्धा खोल जाण्याची शयता निर्माण झाली आहे. अंदोरी येथील वर्धा नदीवरून होणारा शहराचा पाणीपुरवठा बंद पडल्यास याच बंधार्‍याजवळील विहिरीवरून शहराला पाणी पुरवठा होतो, मात्र पातळी खालावल्याने येणार्‍या काळात शहरालाही पाणी टंचाईचा फटका बसण्याची शयता आहे.
बंधार्‍याचे बांधकाम चार ते पाच वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून करण्यात आले होते. पावसाळ्यात पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी या बंधार्‍याला गेट बसवण्यात आले आहे. पावसाळा संपल्यानंतर या बंधार्‍यात उन्हाळ्यातही पाणी साठून राहत होते. त्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होत होती. तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागत होता. परंतु, पावसाळ्यापूर्वी बंधार्‍यातील गाळाचा उपसा करणे आवश्यक होते. गाळ उपसा न झाल्याने आणि बंधार्‍याचे गेट वेळेवर उघडे न केल्याने पहिल्याच पावसात पाण्याने बंधार्‍याच्या बाजूने असलेली शेतजमीन फोडून पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग केला. त्यामुळे यावर्षी या बंधार्‍यात थेंबभरही पाणी साठवता आले नाही.
सध्या पाणी साठवण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात माती व गाळ साचला असून त्याचा उपसा करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच बंधारा फुटलेल्या ठिकाणी तात्काळ भिंतीचे बांधकाम करणे आवश्यक आहे, तरच येणार्‍या पावसाळ्यात पाणी साठवणे शय होईल आणि शेतकर्‍यांच्या विहिरी व जनावरांच्या पाण्याची समस्या सुटेल, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.