नागपूर,
Young women in Nagpur receive self-defens महिलांनी अन्यायाविरोधात आवाज उठवावा, स्वतःच्या संरक्षणासाठी सक्षम व्हावे आणि निर्भयपणे जीवन जगावे, या उद्देशाने चरैवेति फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘आदिशक्ती आत्मसंरक्षण शस्त्र प्रशिक्षण शिबिरा’च्या प्रात्यक्षिकांनी नागपूरकरांचे लक्ष वेधून घेतले. ‘सशक्त युवती, सुरक्षित समाजाची पायाभरणी’ हा संदेश देणाऱ्या या उपक्रमात युवतींनी लाठी-काठी आणि तलवारबाजीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. या कार्यक्रमाला मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा आणि चरैवेति फाउंडेशनच्या अध्यक्षा शिवानी दाणी वखरे यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महापौर नीता ठाकरे, खासदार माया इवनाते, आमदार संजय भेंडे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सभापती दिव्या धुरडे,मंगला खेकरे, बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावने, धनश्री देशपांडे आणि प्रशंसा भोयर यांचीही उपस्थिती लाभली.

शिवानी दाणी वखरे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची भूमिका स्पष्ट केली. गेल्या वर्षी आयोजित शिबिरात १०० हून अधिक मुलींनी सहभाग घेतला होता. या प्रतिसादातून प्रेरणा घेऊन यंदा उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात आली. नागपुरातील ५० हून अधिक ठिकाणी विविध प्रशिक्षण वर्ग, शाळांमधील नववी व दहावीच्या विद्यार्थिनी, महाविद्यालये आणि महिला मंडळांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली. लाठी-काठी कला, आत्मसंरक्षणाची तंत्रे, शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित करण्यावर भर देण्यात आला. शक्तीची उपासना केवळ नवरात्रापुरती मर्यादित न राहता ती महिलांच्या आत्मविश्वासात आणि कृतीत उतरावी, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचा समारोप सोहळा आज सकाळी ८ वाजता लंडन स्ट्रीट, नागपूर येथे पार पडला. युवतींनी सादर केलेल्या लाठी-काठी आणि तलवारबाजीच्या प्रभावी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची दाद मिळवली. महिलांच्या सामर्थ्याचा जागर करणाऱ्या या कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात झाली.
महिलांनी निर्भय व्हावे! – विश्वास नांगरे पाटील
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महिला सुरक्षेसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “ज्या समाजात स्त्रीचा अपमान होतो, तो समाज रसातळाला जातो. महिलांनी निर्भय आणि निडर बनणे आवश्यक आहे. स्वतःच्या संरक्षणासोबतच सोशल मीडिया आणि सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित कसे राहायचे, याचेही प्रशिक्षण आजच्या काळात गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
महिलांनी ‘नाही’ म्हणण्याचे धैर्य दाखवावे! – प्रार्थना बेहरे
अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी महिलांना अन्याय सहन न करता स्वतःच्या अधिकारांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. “कुठे थांबायचे आणि एखाद्या गोष्टीला ठामपणे ‘नाही’ कसे म्हणायचे, हे प्रत्येक महिलेला समजले पाहिजे. प्रत्येक स्त्रीमध्ये शक्ती असते. योग्य वेळी ही शक्ती व्यक्त करण्याची गरज आहे,” असे त्या म्हणाल्या. प्रशिक्षणादरम्यान युवतींमधील ऊर्जा आणि आत्मविश्वास पाहून समाधान वाटल्याचेही त्यांनी सांगितले.
शारीरिक ताकदीसोबत मानसिक सामर्थ्य वाढवा! – नीता ठाकरे
महापौर नीता ठाकरे यांनी प्रशिक्षणात सहभागी झालेल्या युवतींचे आणि प्रशिक्षकांचे कौतुक केले. “महिलांच्या सुरक्षेसाठी शासन प्रयत्नशील आहे; मात्र महिलांनीही स्वतःच्या संरक्षणासाठी सक्षम बनले पाहिजे. महिषासुरमर्दिनीप्रमाणे अन्यायाविरोधात लढण्याचे धैर्य महिलांनी अंगीकारावे. शारीरिक ताकदीसोबत मानसिक सामर्थ्य वाढवून अन्यायाविरोधात दाद मागण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे,” असे त्या म्हणाल्या. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
झलकारीबाईंच्या पराक्रमातून प्रेरणा घ्या! – संजय भेंडे
आमदार संजय भेंडे यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील वीरांगना झलकारीबाई यांच्या पराक्रमाचा उल्लेख केला. इतिहासातील वीरांगनांकडून प्रेरणा घेऊन महिलांनी आत्मसंरक्षणाचे धडे आत्मसात करावेत आणि स्वतःसोबत समाजाच्या सुरक्षेसाठीही जागरूक राहावे, असे आवाहन त्यांनी केले.