मुंबई
aamir khan बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता आमिर खान यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी झालेल्या या भेटीवेळी आमिर खान यांच्या पत्नी गौरी स्प्रॅट यादेखील उपस्थित होत्या, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, आमिर यांचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान याला भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे लक्ष वेधले जात आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, मुंबईतील परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाने (FRRO) इम्रान खान याला २८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत भारत सोडण्याची नोटीस दिली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर पोलिसांनी इम्रानला ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणानंतर इम्रानने संबंधित नोटिशीला आव्हान देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती आहे.या घडामोडी सुरू असतानाच आमिर खान यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने तिच्या संभाव्य कारणांबाबत चर्चा सुरू झाली आहे. आमिर खान आणि राज ठाकरे यांच्यात यापूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध असल्याचेही समोर आले आहे. त्यातच राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर टीका केली होती. त्यामुळे इम्रान खानला बजावण्यात आलेल्या नोटिशीबाबत आमिर यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.मात्र, या भेटीचा नेमका उद्देश काय होता, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच, आमिर खान यांच्या भेटीचा आणि इम्रान खानच्या नोटीस प्रकरणाचा थेट संबंध असल्याचेही स्पष्ट झालेले नाही.