dussehra दसरा म्हटलं की एकमेकांना आपट्याची पानं देत ‘सोनं घ्या, सोन्यासारखं राहा’ असं म्हणण्याची परंपरा आजही जपली जाते. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून लुटली जातात. मात्र, या पानांना सोन्याचं महत्त्व कसं मिळालं? यामागे कौत्स नावाच्या तरुणाची एक पौराणिक कथा सांगितली जाती.
पौराणिक कथेनुसार, कौत्स नावाचा तरुण वरतंतू ऋषींकडे शिक्षण घेण्यासाठी गेला होता. त्याने ऋषींकडून 14 विद्या ग्रहण केल्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कौत्सने गुरूंना गुरुदक्षिणा देण्याचा आग्रह धरला. सुरुवातीला वरतंतू ऋषींनी त्याला गुरुदक्षिणा नको असल्याचे सांगितले. मात्र, कौत्स ऐकण्यास तयार नव्हता. अखेर ऋषींनी त्याच्याकडे 14 कोटी सुवर्णमुद्रांची गुरुदक्षिणा मागितली.
एवढ्या मोठ्या प्रमाणात सुवर्णमुद्रा मिळवण्यासाठी कौत्स राजाकडे गेला. त्याने राजाला आपली अडचण सांगितली आणि गुरुदक्षिणेसाठी 14 कोटी सुवर्णमुद्रांची मागणी केली. मात्र, राजाकडेही त्यावेळी एवढ्या सुवर्णमुद्रा नव्हत्या. त्यामुळे राजाला कौत्सची मागणी पूर्ण करणं शक्य होत नव्हतं.
या कथेनुसार, राजाने सुवर्णमुद्रा मिळवण्यासाठी भगवान इंद्राशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला. भगवान इंद्राला पराभूत करून त्याच्याकडून सुवर्णमुद्रा मिळवता येतील, असा त्यामागचा विचार होता. त्यानंतर राजाने भगवान इंद्राला युद्धाचं आव्हान दिलं. दोघांमध्ये युद्ध झालं आणि राजाने विजय मिळवल्याचं या कथेत सांगितलं जातं. युद्धानंतर भगवान इंद्राने राजाला काय हवं आहे, असं विचारलं. त्यावेळी राजाने राज्य किंवा सिंहासन न मागता कौत्सच्या गुरुदक्षिणेसाठी 14 कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या.
यानंतर भगवान इंद्राने कुबेराला पृथ्वीवर सुवर्णमुद्रांचा वर्षाव करण्यास सांगितलं. कुबेराने आपट्याच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला, अशी पौराणिक मान्यता आहे. कौत्सने त्यातून आपल्या गुरूंना देण्यासाठी आवश्यक असलेल्या 14 कोटी सुवर्णमुद्रा गोळा केल्या आणि त्या वरतंतू ऋषींना गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केल्या. उर्वरित सुवर्णमुद्रा त्याने लोकांना घेण्यासाठी सांगितल्या.
सऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना देण्याची परंपरा सुरू झाली, अशी कथा प्रचलित आहे. आजही दसऱ्याला आपट्याची पानं देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. या परंपरेमागे गुरुदक्षिणा, प्रामाणिकपणा आणि मिळालेल्या गोष्टी इतरांसोबत वाटून घेण्याचा संदेश असल्याचं सांगितलं जातं.