बांगलादेशच्या माजी हवाई दलप्रमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप!

दोन सदनिका जप्त, खाती गोठवली

    दिनांक :19-Oct-2026
Total Views |
ढाका,
former Bangladesh Air Force chief बांगलादेशच्या हवाई दलाचे माजी प्रमुख शेख अब्दुल हन्नान यांना कतारमध्ये अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या हन्नान यांच्या आर्थिक व्यवहारांची बांगलादेशच्या भ्रष्टाचारविरोधी आयोगाकडून (एसीसी) चौकशी सुरू आहे. आयोगाच्या दाव्यानुसार, त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांशी ताळमेळ न बसणारी ३२.८ दशलक्ष बांगलादेशी टाका किमतीची मालमत्ता त्यांनी जमा केली आहे. याशिवाय, त्यांच्या सहा बँक खात्यांमधून २७६.३ दशलक्ष टाकांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचेही तपासात आढळले आहे. एसीसीचे उपसंचालक मोहम्मद अख्तरुल इस्लाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कतारच्या अधिकाऱ्यांनी १५ ऑक्टोबर रोजी हन्नान यांना ताब्यात घेतले. त्यांच्या अटकेबाबतची अधिकृत माहिती इंटरपोलकडून ईमेलद्वारे आयोगाला मिळाली.
 
 

former Bangladesh Air Force chief 
 
या प्रकरणाच्या तपासात हन्नान यांच्या पत्नीचे नावही समोर आले असून, त्यांच्यावरही उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. पतीच्या मदतीने त्यांनी ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा १९.१ दशलक्ष टाका अधिक किमतीची मालमत्ता मिळवल्याचा आयोगाचा दावा आहे. त्यांच्या नावावर असलेल्या ३२ बँक खात्यांमधून ११.८ दशलक्ष टाकांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचेही तपासकर्त्यांनी नमूद केले आहे. हन्नान यांच्या कथित परदेशी मालमत्तेचे धागेदोरे कॅनडा आणि दुबईपर्यंत पोहोचले असून, तीन वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या मुलांच्या नावावर मालमत्ता नोंदवण्यात आल्याचे उघड झाले आहे. तपासाच्या निष्कर्षांनंतर आयोगाने गेल्या वर्षी जुलैमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोप दाखल करण्यास मंजुरी दिली होती. मार्चमध्ये ढाका न्यायालयाने हन्नान आणि त्यांच्या पत्नीच्या आयकर नोंदी जप्त करण्याचे आदेश दिले. तसेच माजी हवाई दलप्रमुखांच्या दोन सदनिका जप्त करण्यास आणि त्यांची बँक खाती गोठवण्यासही न्यायालयाने निर्देश दिले.
 
 
शेख अब्दुल हन्नान यांनी १९८४ मध्ये जनरल ड्युटी पायलट म्हणून बांगलादेशच्या हवाई दलात प्रवेश केला होता. १२ जून २०२१ रोजी त्यांनी हवाई दलाचे १६ वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ ११ जून २०२४ रोजी संपणार होता. दरम्यान, बांगलादेश नौदलाचे माजी प्रमुख ॲडमिरल मोहम्मद नाझमुल हसन हे देखील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना सामोरे जात असून, सध्या परदेशात असल्याचे वृत्त आहे. मात्र, त्यांच्या परदेश प्रवासावर बंदी घालणारा न्यायालयीन आदेश जारी झालेला नाही. दुसरीकडे, श्रीलंकेतही भ्रष्टाचारविरोधी कारवाईला वेग आला असून, माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांचे ज्येष्ठ पुत्र नमाल राजपक्षे यांना श्रीलंकन एअरलाइन्ससाठी एअरबस विमानांच्या खरेदीशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण आशियातील माजी सत्ताधारी आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.