गोंदिया
illegal-sand-transport छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रात झिरो रॉयल्टी पावतीशिवाय अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रक महसूल विभागाने सोमवारी सिरपूर नाक्यावर जप्त केले. दोन्ही ट्रक सध्या देवरी पोलिस ठाण्याच्या आवारात उभे ठेवण्यात आले आहेत.

छत्तीसगड सीमेवरून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक होत असल्याच्या तक्रारी महसूल विभागाला प्राप्त होत होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने तहसीलदारांच्या आदेशानुसार महसूल विभागाचे पथक सिरपूर नाक्यावर गस्त घालत होते. यावेळी छत्तीसगडच्या दिशेने येणारे दोन ट्रक संशयास्पद वाटल्याने त्यांना थांबवून तपासणी करण्यात आली. दोन्ही ट्रकमध्ये रेती आढळून आली. मात्र, चालकांकडे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आवश्यक असलेली रॉयल्टी पावती किंवा अन्य वैध कागदपत्रे नव्हती. नियमानुसार आवश्यक रॉयल्टीची कागदपत्रे नसताना रेतीची वाहतूक करता येत नाही. त्यामुळे महसूल विभागाने दोन्ही ट्रक ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी देवरी पोलिसांच्या स्वाधीन केले. देवरी पोलिस ठाण्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. महसूल विभागाचा लेखी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे.
काठोर कारवाईची मागणी...
छत्तीसगड सीमेवरील गावांमधून रात्रीच्या वेळी विनारॉयल्टी रेतीची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत आहे. त्यामुळे महसूल आणि पोलिस विभागाने संयुक्त नाकाबंदी करून अवैध रेती वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.