तिरुवनंतपुरम,
International airport closed for deity procession विमानतळावरील विमानसेवा तांत्रिक अडचणी किंवा खराब हवामानामुळे बंद ठेवली जाण्याच्या घटना घडतात. मात्र, केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे एका अनोख्या धार्मिक परंपरेसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कामकाज थांबवले जाणार आहे. श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या पारंपरिक ‘अल्पासी आरट्टू’ मिरवणुकीसाठी २० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानांचे उड्डाण आणि अवतरण तात्पुरते बंद राहणार आहे. तिरुवनंतपुरम इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (टीआयएएल) याबाबत माहिती दिली आहे. या निर्णयामुळे संबंधित वेळेत विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या विमान कंपनीकडून उड्डाणांचे अद्ययावत वेळापत्रक तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या बदलामुळे काही विमानांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे.
श्री पद्मनाभस्वामी मंदिराशी निगडित ‘अल्पासी आरट्टू’ ही शेकडो वर्षांची धार्मिक परंपरा आहे. या मिरवणुकीदरम्यान मंदिरातील देवतांच्या मूर्ती विधिवत शंगुमुघम समुद्रकिनाऱ्यावर नेल्या जातात. तेथे धार्मिक विधी केल्यानंतर मूर्ती पुन्हा मंदिरात आणल्या जातात. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून जातो. त्यामुळे मिरवणुकीला कोणताही अडथळा येऊ नये आणि धार्मिक विधी परंपरेनुसार पार पडावेत, यासाठी विमानतळावरील हवाई वाहतूक काही तासांसाठी थांबवली जाते. आधुनिक विमान वाहतुकीच्या व्यवस्थेतही धार्मिक परंपरेला दिले जाणारे हे महत्त्व विशेष मानले जाते.
या प्रथेचा संबंध पूर्वीच्या त्रावणकोर संस्थानाच्या इतिहासाशी जोडला जातो. इतिहासकारांच्या माहितीनुसार, त्रावणकोरचे तत्कालीन राजे श्री चिथिरा तिरुनाल यांनी विमानतळ वर्षातील ३६३ दिवस विमान वाहतुकीसाठी खुले ठेवण्याची आणि उर्वरित दोन दिवस भगवान पद्मनाभस्वामींच्या धार्मिक विधींसाठी राखून ठेवण्याची व्यवस्था केली होती. तिरुवनंतपुरम विमानतळाची स्थापना १९३२ मध्ये झाली. तेव्हापासून वर्षातून दोनदा होणाऱ्या आरट्टू मिरवणुकीच्या वेळी विमानतळाच्या कामकाजात बदल करण्याची परंपरा कायम असल्याचे सांगितले जाते. धार्मिक श्रद्धा आणि आधुनिक विमान वाहतूक यांचा अनोखा संगम घडवणारी ही परंपरा आजही कायम आहे.