मणिपूर,
manipur-voilance-3-killedमणिपूरमध्ये सोमवारी लाकूडफाटा गोळा करणाऱ्या तीन जणांची कथितरित्या दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर स्थानिकांनी निदर्शने केली आणि दोन मृतदेह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर ठेवले.
इम्फाळ पूर्व आणि कांगपोकपी जिल्ह्यांच्या सीमेवर दहशतवाद्यांनी लाकूड गोळा करणाऱ्यांच्या गटावर गोळीबार केल्याने तीन जण जखमी झाले, तर आणखी तीन जण बेपत्ता आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अरुबाम रोनिल (३५) आणि लैरेनलाकपम इनाओबी (५१) यांचा जागीच मृत्यू झाला, तर क्षेत्रिमयूम सुशील (३२) यांचा एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. जखमी एन. सूरज (१९), मेइस्नाम सोमेंद्राव (५३) आणि के. बोसन (४५) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गावाजवळील डोंगरांमध्ये लाकूडफाटा गोळा करायला गेलेल्या १६ जणांमध्ये त्यांचा समावेश होता, तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या आंदोलनानंतर, मुख्यमंत्री वाय खेमचंद सिंह यांनी एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची भेट घेतली, परंतु त्यांनी प्रसारमाध्यमांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.
मे २०२३ पासून राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ संतप्त स्थानिकांनी मृतदेह राजधानीत आणून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ठेवले. या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री निवासस्थानी उपस्थित होते की नाही, हे तात्काळ कळू शकले नाही.