मोनाचा अचूक नेम, भारताला पहिले सुवर्ण!

अवनीनेही जिंकले रौप्य

    दिनांक :19-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Mona's first gold for India आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पहिल्या सुवर्णपदकाची कमाई करत स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे. महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारतीय नेमबाज मोना अगरवालने अंतिम फेरीत २५० गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरले. याच प्रकारात भारताच्या अवनी लेखराने २४९.६ गुणांसह रौप्यपदक पटकावले. त्यामुळे या स्पर्धेतील पहिल्याच सुवर्णपदकासोबत भारताला रौप्यपदकाचीही भेट मिळाली. पात्रता फेरीतही मोनाने आपले वर्चस्व सिद्ध केले होते. तिने ६२९.१ गुण नोंदवत आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेचा विक्रम प्रस्थापित केला होता, तर अवनी दुसऱ्या स्थानावर राहिली होती. अंतिम फेरीत दोन्ही भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत देशाच्या पदकतालिकेत भर घातली.
 
 
damona
 
अंतिम फेरीतील चुरस निर्णायक टप्प्यात अधिक रंगतदार झाली. दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या मालिकेनंतर मोना पाचव्या स्थानावर होती, तर अवनी सुरुवातीपासून चांगल्या लयीत खेळत होती. मात्र, अखेरच्या काही नेमांमध्ये मोनाने जोरदार पुनरागमन केले आणि २५० गुणांचा टप्पा गाठत सुवर्णपदक निश्चित केले. अवनीनेही २४९.६ गुणांसह रौप्यपदक मिळवून भारताचे दुहेरी यश अधोरेखित केले. या दोन्ही खेळाडूंनी २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवल्याची माहिती देण्यात आली आहे. अंतिम क्षणी दाखवलेल्या अचूकतेमुळे मोनाच्या कामगिरीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, भारतीय पॅरा नेमबाजीसाठी हा मोठा यशाचा क्षण ठरला आहे.
 
 
राजस्थानमधील सीकर येथे जन्मलेल्या मोना अगरवालला वयाच्या अवघ्या नऊ महिन्यांत पोलिओची बाधा झाली होती. त्याचा परिणाम तिच्या दोन्ही पायांवर झाला. नेमबाजीकडे वळण्यापूर्वी तिने पॅरा अ‍ॅथलेटिक्स, पॅरा पॉवरलिफ्टिंग आणि महिला सिटिंग व्हॉलीबॉल या क्रीडाप्रकारांतही सहभाग घेतला होता. २०२४ च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले होते. याच वर्षी पॅरा नेमबाजी विश्व अजिंक्यपद स्पर्धेतही तिने रौप्यपदक मिळवले. दुसरीकडे, अवनी लेखरा हिने २०२० च्या टोकियो आणि २०२४ च्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. यावेळी मात्र आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिला भारतीय सहकारी मोनाच्या मागे दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.