नगरसेवक शुभम मोटघरे यांच्यावरील गोळीबार प्रकरणात सात जणांवर मकोका!

    दिनांक :19-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
 
नागपूर
shubham motghare भांडेवाडी परिसरातील काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ ने सात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली आहे. टोळीचा कथित सूत्रधार विशाल ऊर्फ फल्ली गुप्ता याने नगरसेवकाच्या घरावर गोळीबार करण्यासाठी साथीदारांना सुपारी दिल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईमुळे फल्ली गँगच्या अडचणी वाढल्या आहेत.
 

nagpur corporator shubham motghare firing case: seven accused booked under mcoCA 
या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह दाखल असलेल्या गुन्ह्यात मकोकाची कलमे ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) जोडण्यात आली आहेत. या प्रकरणातील सात आरोपी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत, तर टोळीच्या कथित सूत्रधारासह अन्य चार आरोपींचा शोध सुरू आहे.
 
 
मध्यरात्री नगरसेवकाच्या घरावर गोळीबार
शुभम मोटघरे (३१, रा. श्रावणनगर, भांडेवाडी) हे काँग्रेसचे प्रभाग क्रमांक २६ मधील नगरसेवक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १२.४२ वाजताच्या सुमारास ते घराच्या वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये गेले होते. त्याचवेळी घराजवळील वीज वितरण पेटीत स्फोट झाल्यासारखा आवाज आला. गॅलरीत जाऊन पाहिले असता काच फुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता खंडवानी टाउन रोडवरून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने दुचाकीवरून दोन तरुण जाताना दिसले. त्यातील मागे बसलेल्या तरुणाने नगरसेवकाच्या घराच्या गॅलरीच्या दिशेने गोळी झाडल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. गोळी गॅलरीच्या कठड्यावरील काचेला लागल्याने तिला छिद्र पडले आणि काचेचे तुकडे परिसरात विखुरले.यानंतर मोटघरे यांनी ११२ क्रमांकावर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून भांडेवाडी पोलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
 
 
सात आरोपींना अटक; चौघांचा शोध सुरू
पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशानुसार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ कडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी अंकुश झनक तोमरकर (३०), ऋषभ ऊर्फ ऋषी विशाल नागदेवे (२४), अमित मधुकर ठाकरे (२२), कार्तिक बबलू तोमरकर, ऋषभ भगवती पेथेल (३०), केतन दुर्गाप्रसाद माटे (२४) आणि रोमित ऊर्फ फुल्ल्या मुनेश्वर वाहाणे (२१) या सात आरोपींना अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, हे सातही आरोपी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. या प्रकरणात विशाल ऊर्फ फल्ली गुप्ता याच्यासह अशोक ऊर्फ बाबा यादव, सहेली पंधरम ऊर्फ सोनू आणि अनिकेत ऊर्फ अन्नू संजय बिहारे हे चार आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल आणि सहायक पोलिस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट क्रमांक ५ चे पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.