अनिल कांबळे
नागपूर,
nagpur crime चंद्रपुरातील एका शिक्षकाने आपल्या प्रेयसीचा खून करुन तिचा मृतदेह नागपुरातील हिंगणा येथील आधारनगरीतील स्वतःच्या रिकाम्या घरात पुरला. ‘दृष्यम’ स्टाईलने केलेल्या हत्याकांडात चंद्रपुरातील शिक्षकाला पोलिसांनी अटक केली. चंद्रपूर पोलिसांनी हिंगणा पोलिसांच्या मदतीने रविवारी मध्यरात्री घरातील फरशी काढून मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वैशाली विलास टिपले (४५, रा. चंद्रपूर) असे मृत महिलेचे नाव असून, संतोष भगवान साखरकर (४९) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष आणि वैशाली यांचे प्रेमसंबंध होते. १४ ऑक्टोबर रोजी चंद्रपुरात दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. यावेळी संतोषने जड वस्तूने वैशालीवर वार केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने मृतदेह एक दिवस कारच्या डिक्कीत ठेवला.
१५ ऑक्टोबर रोजी आरोपी मृतदेह कारमधून हिंगण्यातील आधारनगरी येथील त्याच्या रिकाम्या घरात घेऊन आला. घराच्या मागील बाजूच्या खोलीत खड्डा खोदून त्याने मृतदेह पुरला आणि त्यावर फरशी बसवली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने वैशालीचा मोबाइल फोन रस्त्यातील रेल्वे बोगद्यात फेकून दिल्याची माहिती तपासात समोर आली. वैशाली बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी तपास सुरू केला. मोबाइल फोन आणि कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी संतोषला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी हत्येचा प्रकार उघडकीस आला.
मध्यरात्री खोदकाम करून मृतदेह बाहेर
चंद्रपूरचे पोलिस निरीक्षक nagpur crime श्याम गव्हाणे हे पथकासह १७ ऑक्टोबरच्या रात्री आरोपीला घेऊन हिंगणा पोलिस ठाण्यात पोहोचले. हिंगण्याचे ठाणेदार प्रमोद घोंगे यांनी महसूल अधिकाऱ्यांना माहिती दिली. नायब तहसीलदार नितीन गोहणे यांच्या उपस्थितीत पंचनामा आणि व्हिडिओ चित्रीकरण करून मध्यरात्रीच्या सुमारास खोदकाम करण्यात आले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून चंद्रपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. चंद्रपूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.