अनिल कांबळे
नागपूर,
nagpur hit and run शहरात पुन्हा एकदा ‘हिट अँड रन’ची घटना समोर आली. नोकरीवर जाण्यासाठी सायकलने निघालेल्या ५७ वर्षीय एसटी कर्मचाऱ्याला भरधाव कारने मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पवन धनीराम गजभिये (वय ५७, रा. रामेश्वरी रोड, जयभीम नगर, भगवान नगर) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. उल्लेखनीय म्हणजे १ महिन्यानंतर पवन गजभिये सेवानिवृत्त होणार होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास पवन गजभिये हे नेहमीप्रमाणे सायकलने एसटी महामंडळाच्या गणेशपेठ डेपो येथे कर्तव्यावर जाण्यासाठी निघाले. इमामवाडा हद्दीतील मेडिकल कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील राजाबाक्षा मैदान रोडवरून जात असताना त्यांच्या मागून भरधाव आलेल्या (एमएच ३३/ जी ११३५) क्रमांकाच्या कारने त्यांच्या सायकलला nagpur hit and run जोरदार धडक दिली. या धडकेत गजभिये गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर वाहनचालकाने घटनास्थळी न थांबता तेथून पळ काढला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी जखमी गजभिये यांना तातडीने मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले; मात्र दुखापत गंभीर असल्याने रात्री ९.१० वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. भृगन पवन गजभिये (वय २६, रा. रामेश्वरी रोड, जयभीम नगर, भगवान नगर) यांच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.