चार गुंतवणूकदारांना १२.२० कोटींचा गंडा

२८ महिन्यांत रक्कम दुप्पट करण्याचे आमिष; सहा जणांविरुद्ध गुन्हा

    दिनांक :19-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur investment fraud अवघ्या २८ महिन्यांत गुंतवणुकीची रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून चार गुंतवणूकदारांची १२ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील नामांकित रामदेव बाबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळातील सहा जणांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, अन्य तीन जणांच्या अचल संपत्तीचे बनावट दस्तऐवज तयार करून ती विकल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
 

nagpur investment fraud 
या प्रकरणात जुगल किशोर (धरमपेठ) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, रामदेव बाबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या संचालकांनी गुंतवणुकीची रक्कम अवघ्या २८ महिन्यांत दुप्पट करून देणारी योजना असल्याचे सांगितले. या आमिषाला बळी पडून गिल्डा यांनी तब्बल १२ कोटी २० लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, निर्धारित मुदत संपल्यानंतर गुंतवणुकीची रक्कम परत मागितली असता, आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. एवढेच नव्हे, तर आधीच्या रकमेवर पुन्हा दुप्पट लाभ देण्याचे आमिष दाखवून पैसे परत करण्यास नकार दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मालमत्तेचे बनावट दस्तऐवज तयार करून विक्री गुंतवणुकीच्या आमिषातून आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपासोबतच अन्य तीन जणांच्या अचल संपत्तीच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे ती विकल्याचाही प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारे गुंतवणुकीच्या योजनेतून पैसे उकळणे आणि बनावट दस्तऐवजांच्या आधारे मालमत्तेची विक्री करणे, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.या प्रकरणात गोपाल हरिकिशन चांडक (४२), मोहन हरिकिशन चांडक (३८), शारदा देवी हरिकिशन चांडक (६०), गणेश विठ्ठलदास चांडक (३८), शिल्पा गोपाल चांडक आणि सुजाता मोहन चांडक (३९) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. हे सर्व आरोपी वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवासी आहेत.
२० मे २००९ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी रविवारी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.