आत्महत्येच्या वाटेवर असलेल्या तरुणीसाठी पोलिस ठरले देवदूत

धावत्या रेल्वेतून डॉक्टर तरुणी ताब्यात : पालकांच्या केले स्वाधीन

    दिनांक :19-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर

police दंत वैद्यकशास्त्राची विद्यार्थिनीने एका मैत्रिणीला नोकरीवर लागण्यासाठी घरातील दागिने आईवडिलांना न सांगता विकून मदत केली. मात्र, त्या मैत्रिणीने पैसे घेतल्यानंतर संपर्क तोडला. त्यामुळे अडचणीत आलेल्या विद्यार्थिनीने पालक रागावतील म्हणून आत्महत्या करायला जात असल्याची चिठ्ठी लिहून घर सोडले. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन चालत्या रेल्वेतून ताब्यात तिचा जीव वाचवला. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतूक होत आहे.
 

police save 23-year-old dental student from suicide attempt in nagpur 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजनी परिसरात राहणारी २३ वर्षांची तरुणी स्विटी (काल्पनिक नाव) शहरातील नामांकित दंत महाविद्यालयात (बीडीएस) दुसऱ्या वर्षांची विद्यार्थिनी आहे. तिचे वडिल शासकीय सेवेतून निवृत्त तर आई गृहिणी आहे. दोन्ही भाऊ नोकरीला असून मोठी बहिण डॉक्टर आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिची एका तरुणीशी ओळख झाली. दोघींची चांगली मैत्री झाली आणि दोघेही एकमेकींना नेहमी मदत करीत होत्या. नोकरीवर लागण्यासाठी तिने स्विटीला मदत मागितली. महिन्याभरात पैसे परत देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे स्विटीने आईचे दागिने गहाण ठेवून तिला पैसे दिले. महिन्याभरात त्या मैत्रिणीने अचानक संपर्क तोडला. त्यामुळे ती अडचणीत आली. यादरम्यान, स्विटीच्या खात्यात स्कॉलरशिपचे पैसे जमा झाले. त्यापैकी काही पैसे आणखी एका मैत्रिणीला मदत म्हणून दिले. महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला प्रवेश घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे स्विटी आर्थिक अडचणीत सापडली.
आत्महत्या करण्याचा घेतला निर्णय
स्विटीने ‘मी आईचे चोरुन दागिने मी गहाण ठेवले आहे. मला त्याचा पश्चाताप होतोय. मी आत्महत्या करण्यासाठी घर सोडून निघून जात आहे. माझा कुणी शोध घेऊ नका.’ अशी चिठ्ठी लिहून १४ ऑक्टोबरला घर सोडले. दुसऱ्या दिवशी कुटुंब अजनी पोलिस ठाण्यात पोहचले. त्यांनी चिठ्ठी दाखवत तक्रार दिली. पोलिस निरीक्षक नितीन राजकुमार यांनी गांभीर्य ओळखून एक पथक तयार केले.
तरुणीच्या शोधासाठी पोलिसांचा आटापीटा
दोन दिवस रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि मंदिरांमध्ये भटकल्यानंतर तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. ती थेट मुंबईला जाणाऱ्या रेल्वेत बसली आणि निघाली. तिला एका मुंबईत नोकरीवर असलेल्या मित्राचा इंस्टाग्रामवर मॅसेज आला. तिने सर्व हकिकत सांगितली. मित्राने तिचा जीव वाचविण्यासाठी पोलिसांना संपर्क केला. सहायक पोलिस उपनिरीक्षक दीपक मोरे यांनी तांत्रिक तपास केला. मुंबईच्या मित्राला सतत स्विटीच्या संपर्कात राहायला सांगितले.
ठाणेदाराच्या रेल्वेतील संबंध आले कामी
अजनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन राजकुमार हे पूर्वी रेल्वे पोलिस विभागात होते. त्यामुळे ठाणेदार राजकुमार यांनी रेल्वे दलातील पोलिस अधिकाऱ्यांशी समन्वय साधत तरुणीची अपडेट दिली. तरुणीचा शोध घेण्यासाठी बडनेरा रेल्वे स्थानकावर एक पथक तैनात केले. तसेच रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजसुद्धा त्यांनी तपासले. तरुणी रेल्वेत बसल्याची खात्री होताच तांत्रिक मदतीने तरुणीला धावत्या रेल्वेतून ताब्यात घेतले.
समूपदेशन आणि पालकांची समजूत
स्विटीचा फोटो आणि कपड्याचे वर्णन आरपीएफला दिली. पोलिसांनी संपूर्ण रेल्वेतील डब्बे तपासले. बडनेरा रेल्वे स्थानकावर गाडी पोहचण्यापूर्वी स्विटीला पोलिसांनी ताब्यात घेतले. अजनी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर दीपक मोरे यांनी स्विटीचे समूपदेशन केले. पालकांची समजूत घातली. पैसे घेऊन पळालेल्या मैत्रिणीचा शोध घेतला. तसेच दागिने परत मिळविण्यासाठीही पोलिसांनी मदत केली.