देवी मंडपाजवळ आढळला अत्यंत दुर्मीळ विषारी 'अल्बिनो मण्यार'

    दिनांक :19-Oct-2026
Total Views |
अकोला
albino-krait akola अकोला शहराच्या कौलखेड भागातील एका देवी मंडपाजवळ एक अत्यंत दुर्मिळ आणि विषारी 'अल्बिनो मण्यार' (Albino Common Krait) हा साप आढळल्याची घटना समोर आली आहे. सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे एका दुर्मिळ जीवाला नवीन जीवन मिळाले आहे.
 

manyar
१९ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास कौलखेड भागातील आई तुळजाभाई नवदुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना मंडपाजवळ एक साप दिसला, कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवत याची माहिती त्वरित सर्पमित्रांना दिली. माहिती मिळताच अकोला जिल्हा MH-30 सर्पमित्र टीमचे सुरज इंगळे आणि अभय निंबाळकर यांनी तातडीने घटनास्थळ गाठले व त्या सापाला सुरक्षितपणे रेस्क्यू केले. सापाची पाहणी केली असता, हा कोणताही सामान्य साप नसून अत्यंत दुर्मिळ व विषारी असा 'अल्बिनो मण्यार' असल्याचे समोर आले. सर्पमित्रांनी सापाला सुरक्षित पकडल्यानंतर वन विभागाचे संघपाल तायडे यांचेशी संपर्क साधून याची रीतसर नोंद केली. त्यानंतर या दुर्मिळ सापाला त्याच्या सुरक्षित आणि नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून देण्यात आले.

'अल्बिनो' म्हणजे निसर्गाची अतिशय दुर्मिळ देणगी
या विशेष प्रकारच्या सापात साप पूर्णपणे दुधासारखा पांढऱ्या रंगाचा असतो आणि त्याच्या डोळ्यांना लालसर झळाळी असते. मण्यार हा साप प्रामुख्याने रात्रीच्या वेळी सक्रिय असतो. दिवसा तो दगड, लाकडाचे ढिगारे, बिळे किंवा घराभोवतीच्या अंधाऱ्या आणि सुरक्षित ठिकाणी लपून राहतो आणि रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतो. मण्यार हा अत्यंत विषारी आणि निशाचर साप आहे.सरपटणाऱ्या प्राण्यांमधील ‘अल्बिनिझम’ ही एक अत्यंत दुर्मिळ आनुवंशिक स्थिती आहे. जनुकीय बदलांमुळे शरीरात 'मेलॅनिन' हे रंगद्रव्य तयार करणारे जनुक तयार होत नाही. मेलॅनिनच्या अभावामुळेच सापाच्या खवल्यांना आणि डोळ्यांना नैसर्गिक रंग प्राप्त होत नाही, ज्यामुळे हा साप पूर्ण पांढरा आणि वेगळा दिसतो.