नागपूर,
ravi-gade-bharatiya-mazdoor-sanghभारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, मेळघाटातील बांबू प्रकल्प केंद्राचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ नागरिक परिसंघ, विदर्भ प्रदेशाचे अध्यक्ष रवी गाडे (वय ६५) यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. गेल्या चार महिन्यांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने सामाजिक, कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चळवळीतील एक समर्पित कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळातून निवृत्त झाल्यानंतरही गाडे यांनी सामाजिक आणि संघटनात्मक कार्यात स्वतःला सक्रिय ठेवले होते. भंडारा, गोंदिया, अकोला आदी जिल्ह्यांमध्ये भारतीय मजदूर संघाचे कार्य वाढविण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. विविध सामाजिक संस्थांना गरजेनुसार आर्थिक मदत करणे, हे ते आपल्या सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य मानत असत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेपासून ते भारतीय मजदूर संघाच्या बैठका आणि वरिष्ठ नागरिक परिसंघाच्या संघटनात्मक कार्यापर्यंत त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग असे. दिवाण लेआउट येथील त्यांचे निवासस्थान सहकाऱ्यांसाठी जिव्हाळ्याचे हक्काचे ठिकाण होते. त्यांच्या पत्नी नंदा वहिनी सर्वांचे आपुलकीने आदरातिथ्य करीत असत. त्यांच्या घरातील स्नेहपूर्ण वातावरणामुळे सहकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. शेतीची विशेष आवड असलेल्या गाडे यांना शेतीतील बारकाव्यांचे उत्तम ज्ञान होते. मेळघाटातील बांबू प्रकल्प केंद्राचे अनेक वर्षे अध्यक्षपद सांभाळताना त्यांनी तेथील स्थानिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले. बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या राख्या दूरवरच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचाव्यात आणि या उपक्रमाला व्यापक प्रतिसाद मिळावा, यासाठी ते सदैव प्रयत्नशील असत. मेळघाटातील निसर्ग आणि तेथील कार्यकर्त्यांशी त्यांचे विशेष नाते होते.
वरिष्ठ नागरिक परिसंघाच्या कार्यातही त्यांनी वसंतरावांच्या मार्गदर्शनाखाली सक्रियपणे योगदान दिले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर काम सुरू असतानाच त्यांच्या निधनाची बातमी आल्याने सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने संघटनात्मक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याची भावना व्यक्त होत आहे.
रवी गाडे यांच्या पार्थिवावर आज दुपारी २ वाजता मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी नंदा वहिनी आणि गाडे कुटुंबीय असा परिवार आहे. रवी गाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.