रा. स्व. संघ हिंगणघाट नगराचा बाल व शिशू विजयादशमी उत्सव

सशक्त समाजनिर्मितीसाठी सज्जनशक्तीचे एकत्रीकरण आवश्यक : शिंगरूप

    दिनांक :19-Oct-2026
Total Views |
हिंगणघाट
rss hinganghat विजयादशमी हा केवळ उत्सवाचा दिवस नसून सकारात्मक प्रवृत्तींचे निर्माण, आत्मचिंतन आणि विजयाचा संकल्प प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. सशक्त समाजनिर्मितीसाठी सज्जनशक्तीचे एकत्रीकरण आणि समाजाचे संघटित होणे आवश्यक आहे, असे विचार अक्षय शिंगरूप यांनी व्यक्त केले.
 

rss hinganghat
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंगणघाट नगराच्या वतीने १८ ऑक्टोबर रोजी स्थानिक एस. एस. एम. विद्यालयाच्या मैदानावर आयोजित बाल व शिशू विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक तथा जय जवान अकादमीचे संचालक सतीश तिमांडे, नगरसंघचालक विनोद नांदुरकर उपस्थित होते.
शिंगरूप पुढे म्हणाले, औपनिवेशिक गुलामगिरीमुळे भारतीय समाज आणि संस्कृतीचे झालेले नुकसान मोठे आहे. राष्ट्राच्या पुनरुत्थानाच्या उद्देशाने डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. दैनंदिन शाखा हे चारित्र्यसंपन्न स्वयंसेवक घडविण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. संघाचे कार्य आज विशाल वटवृक्षाप्रमाणे विस्तारले असून समाजासमोरील वैचारिक, सांस्कृतिक आणि सामाजिक आव्हानांचा सामना करण्यासाठी संघटित समाज हाच राष्ट्राच्या बळकटीचा आधार असल्याचेही शिंगरूप यांनी नमूद केले.
याप्रसंगी सतीश तिमांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून होणाऱ्या चरित्रनिर्मितीच्या कार्यावर प्रकाश टाकला. बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रम, चिकाटी, जिद्द आणि ध्येयाप्रती समर्पण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्सवाच्या प्रारंभी विविध वस्त्यांमधून आलेल्या बाल व शिशू स्वयंसेवकांनी सामूहिक योगासने, अमृतवचन, सुभाषिते आणि ओजस्वी वैयक्तिक गीत सादर केले. या सादरीकरणांतून स्वयंसेवकांचे शारीरिक कौशल्य, शिस्त, आत्मविश्वास दिसुन आला.
प्रास्ताविक व आभार प्रदर्शन नगर सहकार्यवाह पंकज आत्राम यांनी केले. या कार्यक्रमाला संघाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, पालक, नागरिक आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.