कीव्ह,
russia-attack-kyiv-ukraine-12-killedयुक्रेनने अलीकडे केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत रशियाचे वायूदल आणि लष्कराने राजधानी कीव्हसह विविध प्रदेशात रविवारी रात्री जोरदार हल्ले चढवले. रेल्वे स्थानके, मेट्रो स्टेशन्स आणि पायाभूत सुविधांशिवाय निवासी भागांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला यात १२ लोकांचा मृत्यू झाला असून, ५० हून अधिक जखमी आहे.
युक्रेनच्या लष्कराने हल्ल्याची पुष्टी करताना म्हटले की, रशियाने रात्री उशिरा युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये हवाई हल्ला चढवला. या हल्ल्यात मेट्रो स्टेशन, एक २५ मजली निवासी इमारत आणि एका वैद्यकीय केंद्राचे मोठे नुकसान झाले. या घटनेत एका महिलेसेह पाच लोकांचा मृत्यू झाला आणि इतर २५ जण जखमी झाले. याशिवाय इतर प्रदेशातही ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. निवासी भाग आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले, यात सात नागरिक ठार तर २७ लोक जखमी आहे. ढिगाऱ्यात अजूनही अनेक लोक अडकले असून सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू आहे. रशियाचे हल्ले राजधानीतील नागरी पायाभूत सुविधांना धोका निर्माण करत आहेत. युद्धावर राजनैतिक तोडगा काढण्याच्या जागतिक प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून करण्यात येणारे हल्ले संघर्ष चिघळवण्याचा भाग असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
नाटो देशांनी मदत करावी : झेलेन्स्की
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, अमेरिकेने गुप्त माहितीची देवाणघेवाण पुन्हा सुरू केल्यानंतर लगेचच रशियाने लक्ष्य केले. ही गुप्त माहिती युक्रेनियन सैन्याला रशियाकडून येणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा शोध घेण्यास आणि त्यासाठी तयारी करण्यास मदत करते, तसेच वेगाने बदलणाऱ्या धोक्यांविरुद्ध महत्त्वपूर्ण पूर्वसूचना देते. रशियाला रोखण्यासाठी नाटो देशांनी आम्हाला मदत करावी.
तेल करारामुळे संघर्षाची तीव्रता वाढणार
झेलेन्स्की यांनी म्हटले की, अमेरिका आणि रशियामध्ये तेल विक्रीचा करार झाल्याने यापुढे संघर्षाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. रशियावरील निर्बंध उठवल्याने त्यांना युद्धासाठी निधीची उपलब्धता होईल. शस्त्रास्त्र निर्मितीचा वेग अधिक वाढेल पर्यायाने युक्रेनच्या संकटात भर पडेल. अमेरिकेने कराराचा पुनर्विचार करायला हवा अन्यथा निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जाईल. अमेरिकेचे शांतता दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांच्याशीही माझी चर्चा झाली. अमेरिकन प्रशासनाने दोन्ही बाजूंमध्ये तोडगा काढून युद्ध संपवण्याचा प्रयत्न करायला हवा.