उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर

अर्थखात्याच्या मागणीसह राजकीय समीकरणांवर चर्चा होण्याची शक्यता

    दिनांक :19-Oct-2026
Total Views |
मुंबई
sunetra pawar राज्याच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने दिल्लीकडे प्रयाण केले आहे. त्यांचे पुत्र आणि खासदार पार्थ पवार हेही त्यांच्यासोबत दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. पुढील दोन दिवस त्या दिल्लीत मुक्काम करणार असून, या काळात भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) काही वरिष्ठ केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकांतील विजय आणि राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या या दौऱ्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
 
 

sunetra pawar heads to delhi with parth pawar amid political discussions over finance portfolio 
या दौऱ्यात राजकीय विषयांसोबतच अर्थखात्याच्या वाटपाचा मुद्दाही चर्चेला येण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या मागण्या आणि राज्यातील सत्तेच्या समीकरणांबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होऊ शकते. पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून वाढता आग्रह व्यक्त होत असतानाच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे सुनेत्रा पवार यांचे राजकीय वजन वाढल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या खात्यांमध्ये फेरबदल होणार का, तसेच अर्थखाते मिळविण्याच्या मागणीबाबत काही सकारात्मक निर्णय होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, दिल्लीत होणाऱ्या संभाव्य उच्चस्तरीय चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सहभागी होणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पक्षातील संघटनात्मक आणि प्रशासकीय पातळीवर आपली भूमिका अधिक प्रभावी करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या सुनेत्रा पवार यांच्या या दौऱ्यातून राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिल्लीतील भेटीगाठी आणि चर्चांनंतर राज्यातील सत्तावाटप, खातेवाटप तसेच पक्षांतर्गत समीकरणांबाबत कोणती भूमिका समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.