मुंबई,
Three arrested in Tiger Shroff firing case मुंबईतील अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असून, राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावरून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांमध्ये एका अल्पवयीनासह १८ वर्षीय रेहान आणि २२ वर्षीय ऋतिक कुमार यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील रेहान आणि फूल सिंह यांची नावे संशयित म्हणून पुढे आली आहेत, तर बिहारमधील बेगूसरायचा रहिवासी असलेला ऋतिक कुमार मुंबईच्या अंधेरी परिसरात राहत होता आणि रॅपिडो चालक म्हणून काम करत होता. रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी रात्री जुहू परिसरात घडलेल्या गोळीबारानंतर हे संशयित सुरतच्या दिशेने पसार झाल्याची माहिती आहे. राजस्थान पोलिस आणि अँटी गँगस्टर टास्क फोर्सने संयुक्त कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर मुंबई गुन्हे शाखेकडून त्यांना ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले जाण्याची शक्यता आहे.
गोळीबाराची घटना जुहू पोलीस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर घडल्याचे वृत्त आहे. रविवारी संध्याकाळी सुमारे ७ वाजता टायगर श्रॉफ जुहूतील पुष्पा पार्क परिसरातील फुटबॉल मैदानातून आपल्या बीएमडब्ल्यू कारने बाहेर पडत असताना चाहत्यांच्या गर्दीत मिसळलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी सुमारे दहा गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर ते अंधेरीच्या दिशेने पसार झाले. संध्याकाळी ७.१२ वाजताच्या सुमारास त्यांनी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी सोडल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळापासून या स्थानकाचे अंतर सुमारे ३.५ किलोमीटर आहे. त्यानंतर त्यांनी अंधेरीहून वसई रोड गाठून पुणे–जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने प्रवास सुरू केला. अखेर सोमवारी सकाळी १०.१७ वाजता कोटा रेल्वे स्थानकावर त्यांना ताब्यात घेण्यात आले. या हल्ल्यात टायगर श्रॉफ सुरक्षित असला, तरी फुटलेल्या काचेच्या तुकड्यांमुळे त्याला किरकोळ दुखापत झाल्याचे वृत्त आहे. त्याचा चालक फिरदोस आणि चाहता उमेश चरण हेही जखमी झाले. उमेश याच्यावर केईएम रुग्णालयात, तर फिरदोस याच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले जाणारे अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी कथित ऑडिओ क्लिप आणि फेसबुक पोस्टद्वारे हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्याची आणि हल्ल्यामागील नेमक्या सूत्रधारांची भूमिका तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे. हल्ल्यापूर्वी संशयितांनी परिसराची पाहणी केल्याचा संशय असून, सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारेही तपास सुरू आहे. टायगरच्या चालकाच्या तक्रारीवरून जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी १५ पथके तयार केली असून, मुंबई गुन्हे शाखाही समांतर तपास करत आहे. कोटा येथून ताब्यात घेतलेल्या तिघांची चौकशी झाल्यानंतर हल्ल्याचे नियोजन, त्यामागील कारण आणि इतर संबंधित व्यक्तींबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.