मुंबई
tiger shroff अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या हल्ल्यामागील घटनाक्रमाचे तपशील समोर येत आहेत. या प्रकरणी राजस्थानमधील कोटा पोलिसांनी रेहान ऊर्फ सुक्का, ऋतिक कुर्मी ऊर्फ रोशन आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या या गोळीबारामागे अनिल पंडित याचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. अनिल पंडितने रेहानशी संपर्क साधून त्याला या हल्ल्याची जबाबदारी दिल्याची माहिती कोटा पोलिसांनी दिली. अनिल पंडितचे लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचाही पोलिसांचा दावा आहे.
कोटा पोलिसांच्या अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात सहभागी असलेले तिघे आरोपी पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने प्रवास करत होते. त्यांना दिल्लीमार्गे नेपाळमध्ये पळून जायचे होते. मात्र, मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिसांना आरोपींच्या प्रवासाबाबत माहिती दिल्यानंतर कोटा पोलिसांनी तातडीने कारवाई केली. सकाळी सुमारे ९.४५ वाजता पोलिसांना यासंदर्भातील माहिती मिळाली. त्यानंतर रेल्वेस्थानकावरील बाहेर पडण्याचे मार्ग, फलाट आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी पाळत ठेवली. रेल्वे सुरक्षा दलालाही सतर्क करण्यात आले. सकाळी १०.१७ वाजता कोटा स्थानकावर पोहोचलेल्या पुणे-जयपूर एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यातून तिघांना ताब्यात घेण्यात आले.
सापळा रचून कारवाई
मुंबई पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत कोटा पोलिसांनी सापळा रचून कारवाई पूर्ण केल्याचे तेजस्विनी गौतम यांनी सांगितले. तिन्ही संशयितांना लवकरच मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अटकेतील रेहान हा हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील असून, ऋतिक हा बिहारमधील बेगुसरायचा रहिवासी आहे. तो गेल्या काही वर्षांपासून मुंबईत राहत होता. तिसरा आरोपी अल्पवयीन आहे.
रॅपिडो चालक म्हणून काम
प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, रेहानने सोनीपत येथील एका अल्पवयीन मुलाला या कटात सहभागी करून घेतले. त्यानंतर रेहान, अल्पवयीन मुलगा आणि ऋतिक यांनी मिळून गोळीबाराची घटना घडवून आणल्याचा पोलिसांचा संशय आहे. ऋतिक हा मुंबईत रॅपिडो चालक म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याला परिसरातील रस्ते आणि मार्गांची चांगली माहिती होती. रेहान सोनीपत येथे मजुरीची कामे करत होता. या तिघांनी मुंबईत आल्यानंतर परिसराची रेकी केली आणि त्यानंतर हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींच्या प्राथमिक जबाबानुसार, या हल्ल्यामागे टायगर श्रॉफची हत्या करण्याचा हेतू नव्हता, तर त्याला धमकावणे हा उद्देश होता. पैशांच्या मोबदल्यात गोळीबार केल्याची माहितीही चौकशीत पुढे आली आहे. मात्र, या दाव्याची अधिक तपासातून पडताळणी केली जाणार आहे. आरोपींनी थेट लॉरेन्स बिश्नोईला ओळखत नसल्याचे आणि त्याची कधीही भेट घेतली नसल्याचे सांगितले आहे. अनिल पंडितनेच रेहानशी संपर्क साधून गोळीबाराची जबाबदारी दिल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले. हल्ल्यासाठी आवश्यक साधनसामग्री लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित व्यक्तींनी पुरविल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.
रविवारी सायंकाळी मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या कारवर तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या घटनेत अभिनेत्याला कोणतीही दुखापत झाली नाही; मात्र त्याचा चालक आणि अन्य एक व्यक्ती जखमी झाले. हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओद्वारे लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला जात आहे. मात्र, संबंधित व्हिडिओची सत्यता अद्याप पडताळण्यात आलेली नाही.
या प्रकरणातील आरोपींच्या पार्श्वभूमीची माहितीही समोर आली आहे. रेहान हा सोनीपत जिल्ह्यातील देवरू गावात आई आणि लहान भावासोबत राहत होता. तो सुमारे १२ वर्षांपूर्वी वडिलांपासून वेगळा झाला होता. नववीत नापास झाल्यानंतर त्याने शिक्षण सोडले आणि काम करण्यास सुरुवात केली. यापूर्वी अवैध शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणात त्याला तुरुंगवासही भोगावा लागला होता, अशी माहिती कोटा पोलिसांनी दिली. रेहानची मावशी अफसाना हिने दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगातून सुटल्यानंतर तो वेल्डिंगचे काम करत होता. घरातून बाहेर पडताना वेल्डिंगच्या कामासाठी जात असल्याचे त्याने सांगितले होते.
दगड आणि फरशा बसविण्याचे काम
दुसरीकडे, अल्पवयीन आरोपीचा वडील गोहाना येथे दगड आणि फरशा बसविण्याचे काम शिकत असल्याचे सांगतो. १३ तारखेला तो घरी आला होता; त्यानंतर तो कुठे गेला, याची आपल्याला माहिती नसल्याचे वडिलांनी म्हटले आहे. आपण स्वतः दिव्यांग असून वीट फोडण्याचे काम करून उदरनिर्वाह करतो, असेही त्यांनी सांगितले. आपल्या मुलाला कोणीतरी फूस लावून या प्रकरणात ओढले असावे, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
गोळीबारासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे अद्याप पोलिसांना सापडलेली नाहीत. आरोपींनी शस्त्रांचे काय केले, याबाबत त्यांची सविस्तर चौकशी करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे तेजस्विनी गौतम यांनी स्पष्ट केले. अनिल पंडित आणि रेहान यांच्यात संपर्क असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले असून, अनिल पंडितचे लॉरेन्स बिश्नोईशी संबंध असल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून पुढील तपास केला जाणार असून, आरोपींच्या चौकशीतून हल्ल्याचे नेमके कारण, आर्थिक व्यवहार आणि इतर सहभागी व्यक्तींबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.