टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्राबाहेर!

    दिनांक :19-Oct-2026
Total Views |
मुंबई,
Tiger Shroff shooting incident अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबाराच्या घटनेची महाराष्ट्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणातील आरोपींसह पडद्यामागून सूत्रे हलवणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना तपासात महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून, काही संशयितांची ओळखही पटली आहे. या प्रकरणातील काही आरोपी महाराष्ट्राबाहेर, तर काही देशाबाहेर राहून कारवाया करत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी इतर राज्यांतील पोलीस यंत्रणांशी समन्वय साधण्यासह परदेशात लपलेल्यांविरोधात केंद्र सरकारची मदत घेतली जाणार आहे.
 
shao
 
 
या प्रकरणात राज्याच्या हद्दीतून कार्यरत असलेल्या आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. उर्वरित संशयितांना ताब्यात घेण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्नशील असून, केवळ प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्यांवरच नव्हे, तर त्यांना निर्देश देणाऱ्या सूत्रधारांवरही कारवाई करण्याचे पोलिसांचे उद्दिष्ट आहे. कोणत्याही टोळीचे नाव समोर आले, तरी कारवाईत कोणालाही सूट दिली जाणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. धमकी आणि हिंसक घटनांच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
रविवारी संध्याकाळी मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या कारवर अनेक गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. गोळीबारात अभिनेत्याचा चालक आणि एका रिक्षाचालकाच्या जखमी झाल्याचे वृत्त आहे. तसेच दारूगोळ्याच्या परिणामामुळे आणि काचेचे तुकडे लागल्याने टायगर श्रॉफ यांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती देण्यात आली. घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सध्या मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात असून, या हल्ल्यामागील संपूर्ण कट उघड करण्यावर तपास यंत्रणांचा भर आहे.