राज्यात रस्ते अपघातात सर्वाधिक बळी पुण्यात!
तिसऱ्या स्थानावर नागपूर ग्रामीण : आठ महिन्यांत १० हजार २८२ जण ठार
अनिल कांबळे
नागपूर,
10,000 lives lost in road accidents राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले असून, गेल्या आठ महिन्यांत झालेल्या विविध अपघातांमध्ये तब्बल १० हजार २८२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. रस्ते अपघातात सर्वाधिक बळी पुणे ग्रामीण मध्ये असून दुसरा क्रमांक पिंपरी-चिंचवड तर नागपूर ग्रामीणचा राज्यात तिसरा क्रमांक लागतो. पुणे ग्रामीणमध्ये ६५४ तर पिंपरी चिंचवडमध्ये २४५ तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या नागपूर ग्रामीणमध्ये २४१ जण ठार झाले आहेत. अपघाती मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील महामार्ग आणि ग्रामीण रस्त्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात रस्ते अपघाताची संख्या वाढली आहे. राज्यातील रस्ते अपघातांची आकडेवारी पाहता, अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतानाही मृत्यूंचे प्रमाण मोठे असल्याचे स्पष्ट होते. वेगमर्यादेचे उल्लंघन, निष्काळजी वाहनचालक, वाहतुकीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष आणि रस्त्यांवरील असुरक्षित परिस्थिती यांसारख्या बाबींमुळे अपघातांची तीव्रता वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, प्रत्येक अपघातामागील नेमके कारण तपासातूनच स्पष्ट होऊ शकते. पुणे ग्रामीणमध्ये १३२२ अपघातांमध्ये सर्वाधिक ६५४ जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ९०६ रस्ते अपघातात २४५ जणांनी अपघातात प्राण गमावले. त्यापाठोपाठ नागपूर ग्रामीणमध्ये ५५९ अपघातांना २४१ मृत्यूंची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकातील मृत्यूंच्या संख्येत केवळ चारचा फरक आहे. त्यामुळे नागपूर ग्रामीणमधील अपघातांचे गांभीर्य अधोरेखित होते.
समृद्धीवर तीन वर्षांत ४२७ जण ठार
एक्स्प्रेस हायवे असलेल्या समृद्धीवर गेल्या तीन वर्षांत ४२७ जणांचा रस्ते अपघातात बळी गेला. वाहनांचा सुसाट वेग आणि वाहनांवरील सुटलेले नियंत्रणामुळे सर्वाधिक अपघात झाले आहेत. २०२४ मध्ये (१२६ ठार), २०२५ मध्ये (१७३ ठार) तर २०२६ ऑगस्टपर्यंत १२७ जणांचा रस्ते अपघातात बळी गेला आहे. राज्यात सर्वाधिक अपघात ट्रक आणि टिप्पर वाहनांचे झाले असून ट्रकच्या धडकेत गेल्या दोन वर्षांत ११८४ बळी गेले आहेत.
तीन वर्षांत ५१६८ महिलांचा बळी
राज्यात गेल्या तीन वर्षांत झालेल्या रस्ते अपघातात ५१६८ महिलांचा बळी गेला आहे. यामध्ये सर्वाधिक १२ ते ३५ या वयोगटातील महिलांचा समावेश आहे. तीन वर्षांत ३६ हजार ८६३ पुरुषांचा अपघातात बळी गेला आहे. तसेच ७५० च्यावर मुलांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. अपघातांमधील मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी, वेगमर्यादेवर नियंत्रण, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई, हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर तसेच अपघातप्रवण ठिकाणांची सुधारणा यावर भर देण्याची गरज आहे.