पुणे
heatwave maharashtra राज्यातील अनेक भागांत आता पावसाने उघडीप दिली आहे. अशातच आता ऑक्टोबर हिटचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागत आहे. 3 ऑक्टोबर रोजी कोकणातील काही भागांत उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच इतरही भागांत वातावरण कोरडे राहून उन्हाचा त्रास नागरिकांना सोसावा लागणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
3 ऑक्टोबर रोजी कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत प्रामुख्याने उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे. त्यासाठी यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. मुंबईतील तापमान 27 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. अचानक उष्ण वातावरण निर्माण झाल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा परिसर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत 3 ऑक्टोबर रोजी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तसेच तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिकमधील तापमान देखील 27 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर या भागांत 3 ऑक्टोबर रोजी हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर आणि घाटमाथा परिसरात पुढील दिवसांत पावसाची शक्यता दाखवण्यात आली असली, तरी 3 ऑक्टोबरसाठी कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. पुणे शहरातील तापमान 22 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान असू शकतं.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यांत 3 ऑक्टोबर रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. या भागात देखील तापमानात वाढ नोंदवली जाण्याची शक्यता आहे. छ्त्रपती संभाजीनगरमधील तापमान 24 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान असू शकतं.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी 3 ऑक्टोबर रोजी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. या भागांत तापमान सर्वाधिक 27 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. विदर्भातही तापमानात वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे आता नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.