मालेगाव,
Accident News समृद्धी महामार्गावर मालेगाव परिसरात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात आयशर वाहनातील सुमारे १५ वर्षीय किशोराचा जागीच मृत्यू झाला, तर आयशर चालक गंभीर जखमी झाला. मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक २५७/७०० जवळ रात्री सुमारे १२.४५ वाजता हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यू. पी. ६३ बीटी ०९७९ क्रमांकाचा आयशर नागपूरहून संभाजीनगरकडे जात होता. दरम्यान, चालकाने पुढे जात असलेल्या एका अज्ञात वाहनाला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत आयशरमधील सुमारे १५ वर्षीय आशिषकुमार गणेश याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात आयशर चालक कमलेशकुमार वय ३८, राहणार महेशपूर, जिल्हा मिर्झापूर उत्तर प्रदेश, हा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच त्याला रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथक अमाणीचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश सरनाईक, पोकॉ अमोल कापडी, संतोष ठाकरे तसेच एमएसएफचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मालेगाव पोलिस ठाण्याचे पोहेकॉ दिलीप राठोड आणि चालक पोकॉ मनोज नेतनेस्कर यांनीही घटनास्थळी पोहोचून आवश्यक कार्यवाही केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.