मुंबई,
Actor Dino Morea arrested बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया याला मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणात मुंबई पोलिसांनी कठोर पावले उचलत त्याच्या मुंबईतील राहत्या घरातून अटक केली आहे. अटकेची कारवाई केल्यानंतर दिनो मोरिया याला अधिक चौकशीसाठी थेट मुंबई पोलीस आयुक्तालयात आणण्यात आले आहे. यापूर्वी दिनो मोरियावर दिशा सालियान प्रकरणातही आरोप करण्यात आले होते, तसेच मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणात त्याला याआधी सक्तवसुली संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या चौकशीलाही सामोरे जावे लागले होते आणि त्याच्या राहत्या घरी छापेमारी देखील करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आज २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळपासून दिनो मोरिया याची चौकशी सुरू होती आणि सुमारे आठ तास चाललेल्या या सखोल चौकशीनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटकेची कारवाई पूर्ण केली आहे.
मिठी नदीचा गाळ उपसा आणि अभिनेता दिनो मोरिया यांच्यातील कनेक्शन हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कंत्राटातील कथित ६५ कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफरीच्या तपासाशी संबंधित आहे. मिठी नदी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदम याने बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांच्याशी अनेक फोनवरून संभाषण केले होते, आणि आरोपीशी संबंधित कॉल रेकॉर्ड तसेच आर्थिक व्यवहारांच्या विश्लेषणादरम्यान दिनो मोरियाचे नाव प्रकर्षाने पुढे आले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्लज पुशर्स आणि ड्रेजिंग मशीन्सचा वापर करून मिठी नदीच्या साफसफाईची मोहीम हाती घेतली होती, आणि या मशीन्स कोचीस्थित मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून मोठ्या रकमेला खरेदी करण्यात आल्या होत्या.
या तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की केतन कदम आणि जय जोशी यांनी मॅटप्रॉप आणि बीएमसीच्या स्टॉर्म वॉटर ड्रेन्स विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून या साफसफाई प्रकल्पाच्या नावाखाली ६५ कोटी रुपयांचा घोटाळा केला. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी केतन कदम याच्या कॉल रेकॉर्ड्सची तपासणी केली असता अभिनेता दिनो मोरिया आणि त्याच्या भावाची नावे समोर आली असून, या दोघांनीही केतन कदमशी अनेकदा संवाद साधला होता. दिनो मोरिया आणि केतन हे केवळ मित्रच नाहीत, तर त्यांच्यात आर्थिक व्यवहारही झाले असावेत असा तपास यंत्रणांचा दाट संशय आहे, त्यामुळेच दिनो मोरियाचा या तपासात समावेश करण्यात आला असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.