वाशीम,
Ahilyadevi Holkar Farmers' Loan Waiver Schemeपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत वाशीम जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकर्यांपैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ६ हजार ९८१ शेतकर्यांच्या खात्यात तिसर्या टप्प्यात ७२.०७ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. पहिला, दुसरा व तिसरा टप्पा मिळून आतापर्यंत ५० हजार ६४१ पात्र शेतकर्यांच्या खात्यात ४४६.९८ कोटी रुपये जमा झाले आहेत.
राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. वाशीम जिल्ह्यात सेवा सहकारी संस्था (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) तसेच राष्ट्रीयकृत, ग्रामीण व खासगी बँकांमधील एकूण ६२ हजार ८८७ पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत ५३ हजार ९५७ शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून अद्यापही ८ हजार ९३० शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांची अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक आहे.
शेतकर्यांनी विशिष्ट क्रमांक व आधार क्रमांक घेऊन नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. बहुतांश पात्र लाभार्थी शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदणीअभावी बाकी असल्याने संबंधित शेतकर्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडीची नोंदणी करून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. पात्र शेतकर्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा उपनिबंधक माणिक लटपटे यांनी केले आहे.