चहलचा ‘लाल चेंडू’ला अखेरचा सलाम!

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
chahals-final-salute-to-the-red-ball भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रमुख फिरकीपटू युझवेंद्र चहल याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. २ ऑक्टोबर रोजी समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे चहलने आपल्या निर्णयाची माहिती दिली. प्रथम श्रेणी क्रिकेटला निरोप देत असला तरी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळणे सुरूच ठेवणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. भारतीय संघाकडून चहलने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. मागील काही काळापासून तो इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्येही खेळत होता. लॉर्ड्सच्या मैदानावर नॉर्थम्प्टनशायरविरुद्ध खेळलेला सामना हा त्याचा अखेरचा लाल चेंडूचा सामना ठरला.
 
chahals-final-salute-to-the-red-ball
 
आपल्या निवृत्तीची घोषणा करताना चहलने लाल चेंडूच्या क्रिकेटशी असलेल्या भावनिक नात्याला उजाळा दिला. वयाच्या दहाव्या वर्षी त्याने पहिल्यांदा हातात घेतलेला क्रिकेटचा चेंडू लाल रंगाचा होता आणि तेव्हापासून क्रिकेटशी त्याचे नाते अधिक घट्ट होत गेले, असे त्याने सांगितले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधूनच संयम, कठीण परिस्थितीचा सामना करण्याचे धैर्य आणि प्रत्येक धाव तसेच विकेटसाठी दीर्घकाळ मैदानावर टिकून राहण्याचे महत्त्व शिकल्याचे चहलने नमूद केले. लॉर्ड्सवर आपला अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळल्याचे सांगताना तो भावूक झाला. भारतीय कसोटी संघात स्थान मिळवणे हे त्याचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न होते; मात्र हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. तरीही आपल्या क्रिकेट प्रवासाबद्दल आपण समाधानी असून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मिळालेल्या प्रत्येक संधीबद्दल कृतज्ञ असल्याचे त्याने म्हटले.
 
प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही चहलने आपल्या पुढील वाटचालीचे संकेत दिले आहेत. आपल्यात अजून बरेच क्रिकेट शिल्लक असून एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये पुन्हा संधी मिळवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत राहणार असल्याचे त्याने सांगितले. भारतीय संघापासून तो गेल्या काही काळापासून दूर आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत साथ दिल्याबद्दल हरियाणा क्रिकेट असोसिएशनसह रणबीर सिंग महिंद्रा आणि अनिरुद्ध सिंग चौधरी यांचेही चहलने आभार मानले आहेत.