तांब्याची पट्टी चोरणार्‍या दोन आरोपींना मुद्देमालासह अटक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
वाशीम,
copper-theftतांब्याची अर्थिंग पट्टी चोरी करणार्‍या सोनखास येथील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ६१ हजार ५०० रुपये किमतीचा ४१ किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्युत कंत्राटदार अमोल प्रकाश राठी रा. मंत्री पार्क, वाशीम यांचे पंचाळा फाटा येथे विद्युतीकरणाचे काम सुरू असून तिथे साहित्य ठेवण्यासाठी गोदाम आहे. २५ सप्टेंबरच्या सायंकाळी ५:३० ते २६ सप्टेंबरच्या सकाळी १०:३० वाजेच्या दरम्यान अज्ञाताने या गोदामाचे कुलूप तोडून ५० किलो वजनाची तांब्याची अर्थिंग पट्टी चोरून नेली.
 
 
 
copper
याप्रकरणी वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी तपास करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर आडे यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. समांतर तपास सुरू असताना तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तुकाराम सुरेश गोरे व संतोष कोंडजी खंदारे (वय २६ ) दोघे रा. सोनखास, ता. जि. वाशीम यांनी आपल्या इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस पथकाने १ ऑटोबर रोजी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून ६१ हजार ५०० रुपये किमतीची ४१ किलो तांब्याची अर्थिंग पट्टी जप्त करण्यात आली आहे.गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधाकर आडे, सहायक पोलिस निरीक्षक योगेश धोत्रे, पोलिस अंमलदार गजानन झगरे, अशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, अमोल इरतकर, दिपक घुगे आणि संतोष वाघ यांनी केली.